गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा गडगडाटी पाऊस होत आहेत. गेल्या २४ तासांत, दक्षिण कोकण आणि गोवा येथे मध्यम ते जोरदार पाऊस पडला असून, उत्तर कोकण ,गोवा आणि मध्य महाराष्ट्र या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला आहे तसेच मराठवाडा आणि विदर्भामधील काही ठिकाणी पाऊस पडला आहे.
सध्या उत्तर मध्य महाराष्ट्र आणि आसपासच्या पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये एक चक्रावती प्रणाली तयार झाली आहे. या प्रणालीपासून एक ट्रफ रेषा उत्तर अंतर्गत कर्नाटक आणि आसपासच्या तेलंगाणापर्यंत विस्तारित आहे. तसेच महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत देखील एक ट्रफ रेषा आहे.
या प्रणालींच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्रावर गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून, दक्षिण कोकण आणि गोवामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हळूहळू उद्यापासून मुंबईसह उत्तर कोकण आणि गोवामध्ये पावसाचा जोर वाढेल. मुंबई, डहाणू, ठाणे आणि आसपासच्या भागात एक किंवा दोन जोरदार सरींसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. साधारणपणे २९ जून पर्यंत हा पाऊस सुरू राहील अशी अपेक्षा आहे.
दरम्यान पुढील २४ ते ४८ तास मराठवाडा आणि विदर्भावर पावसाचा जोर कमी असेल. तथापि, २९ जूनपर्यंत या दोन क्षेत्रांमध्ये पावसाच्या तीव्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे. बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे २ जुलैपर्यंत विदर्भ आणि मराठवाडा मध्ये तीव्र ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मान्सूनचा हंगाम असल्याने महाराष्ट्रात पावसाचा लपंडाव सुरूच राहील.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे