पावसाच्या आगमनामुळे मुंबईकर सध्या सुखद गारवा अनुभवत आहेत. वातावरणातील शुष्क आणि कोरडेपणा गेल्यामुळे तापमानातही बराच फरक झालेला आहे
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुंबईत चांगला पाऊस झाला होता त्यानंतर आत्ताच मुंबईत चांगल्या पावसाने हजेरी लावली आहे.
नाही म्हणायला १३ मे ला संध्याकाळी शहरात बऱ्याच ठिकाणी हलक्या सरी झाल्या होत्या. गेल्या काही दिवसात मुंबईत पावसाचा लपंडाव हा सुरूच होता. हवातसा पाऊस न झाल्याने मुंबईकर मात्र उकाड्याचा सामना करत होते. जून महिना मात्र चांगला पाऊस घेऊनच सुरु झाला आहे असे म्हणायला हरकत नाही.
गेल्या २४ तासात मुंबईत बऱ्याच भागात चांगलाच पाऊस झालेला आहे. सांताक्रूझ हवामान वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी ८.३० पर्यंत गेल्या २४ तासात २७ मिमी आणि कुलाबा वेधशाळेनुसार २४ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.
मुंबई लगत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईत सध्या पाऊस होतो आहे. तसेच अरबी समुद्रावरून येणारे वारे देखील आर्द्रता घेवून येत आहेत त्याची सुद्धा मदत होताना दिसते आहे.
स्कायामेट च्या अंदाजानुसार हा पाऊस असाच सुरु राहील किंबहुना त्याच्या तीव्रतेत थोडी वाढच होईल. त्यामुळे मुंबईकर मरीन ड्राईव्ह वर हातात वाफाळणारा चहा आणि भुट्टा घेवून फिरताना दिसतील. मान्सून विषयी बोलायचे झाले तर येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून या स्वप्ननगरीत दाखल होईल असे वाटते.
[yuzo_related]
Image credit: ToI
Any information taken from here should be credited to skymetweather.com