अर्धा जुलै संपला तरी विदर्भात पावसाची उघडझाप चालूच आहे मात्र मराठवाड्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. पावसाच्या अभावामुळे आणि वातावरणातील वाढत्या आर्द्रतेमुळे तापमानात वाढ होते आहे आणि हे दोन्ही भागातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या चिंतेचे कारण झाले आहे. भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागानुसार या दोन भागात विखुरलेला आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल आणि त्यामुळे पावसाची झालेली तुट भरून निघेल.
मान्सून सुरु झाल्यापासून म्हणजेच १ जून ते १५ जुलै पर्यंतच्या काळात विदर्भात नेहमीपेक्षा १० टक्के कमी पाऊस झाला आहे तर मराठवाड्यामध्ये ४४ टक्के पावसाची तुट निर्माण झाली आहे.
१७ जुलैपासून पुढे चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणे अपेक्षित असल्याने या भागातील लोकांना थोडा दिलासा मिळेल. या पावसाची तीव्रता १८ ते २० जुलै दरम्यान वाढणे अपेक्षित आहे. हा मान्सूनचा पाऊस राजस्थानवर ते दक्षिण मध्य प्रदेशापर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे होणार आहे.
मराठवाड्यात १७ आणि १८ जुलैला हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात होणाऱ्या पावसामुळे या शहरातील तापमान २५-३६ अंश से. ला स्थिरावण्याची शक्यता आहे.
Image credit: jasdt.deviantart.com