गेल्या २४ तासांत मध्य भारतातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा आणि पूर्व मध्य प्रदेशात या पावसाची नोंद झाली.
स्कायमेटच्या हवामानशास्त्रज्ञांनी आज तसेच उद्याही या दोन्ही राज्यात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. तथापि, पुढील २४ तासांनंतर तीव्रता कमी होईल. हा पावसाचा पट्टा येत्या १० जानेवारीपर्यंत मध्य भारतातून पूर्व दिशेने सरकण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसामागील कारणे
सामान्यत: हिवाळ्यातील हवामान प्रणाली पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि उत्तरेकडील मैदानी भागांवर पार पश्चिम उत्तर प्रदेशापर्यंतच्या हवामानास प्रभावित करतात. ह्या प्रणाली मध्यप्रदेशचा उत्तर भाग वगळता महाराष्ट्र आणि उर्वरित मध्य प्रदेशसह देशाच्या मध्य भागात पोहोचण्यास अपयशी ठरतात.
तथापि, कधीकधी काही विशिष्ट परिस्थितींमुळे या प्रणाली दूर पर्यंत पोहोचतात आणि मध्य भारतातील हवामानासही प्रभावित करतात, परिणामी पाऊस पडतो. आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा पाऊस पडतो तेव्हा याला अवकाळी पाऊस असे म्हणतात.
हवामान प्रणाली
राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागांवरील उच्च-दाबाचे क्षेत्र (सामान्यत: प्रतिचक्रवात म्हणून ओळखले जाते) पश्चिमी विक्षोभ जवळ आल्यामुळे दूर ढकलले जाते, वाऱ्यांची दिशा बदलते आणि बर्याचदा विभिन्न दिशेने येणाऱ्या वाऱ्यांच्या संगम क्षेत्राची निर्मिती होते. दोन वेगवेगळ्या दिशांकडून वारा एकमेकांत विलीन झाल्याने मध्य भारतात अवकाळी पाऊस पडतो. या अवकाळी पावसाच्या अनुषंगाने नेहमीच गारपिट होण्याची शक्यता असल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वाढते.
हवामान अंदाज
दोन दिवसांच्या या अवकाळी गतिविधींनंतर चार ते पाच दिवसांचा कालावधी असेल ज्यामध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. त्यानंतर, (११ जानेवारीच्या सुमारास) आणखी एक पश्चिमी विक्षोभ येण्याची शक्यता आहे ज्याचा परिणाम मध्य भारतावर होईल आणि त्यामुळे पाऊस पडेल. या कालावधीत मध्य प्रदेशात गारपीट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र मात्र यावेळी या अवकाळी पासून बचावेल अशी अपेक्षा आहे.
Image Credits – Hindustan Times
Any information taken from here should be credited to Skymet Weather