मुंबईमध्ये भिंत कोसळून बावीस जण ठार झाले असून, सलग तिसऱ्या दिवशी पडणाऱ्या जोरदार पावसामुळे मुंबईचे कंबरडे मोडले आहे. मुंबईतील बहुतांश भाग पाण्याखाली गेल्यामुळे बऱ्याच कार्यालयांना मंगळवारी सुट्टी जाहीर करावी लागली.सूत्रांनुसार सोमवार पासून पावसामुळे उर्वरित महाराष्ट्रात १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
रविवारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये रेल्वे, हवाई आणि रस्ते वाहतुकीचा मोठा गोंधळ उडाला आहे. अनेक गाड्या आणि उड्डाणे रद्द केली गेली आहेत. हवामान विभागाने मंगळवारी जोरदार पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळे मुंबई शहर आणि आसपासच्या भागात सुट्टी जाहीर केली असून लोकांना घराबाहेर न पाडण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी सकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईतील मालाडच्या उत्तर उपनगरात भिंत कोसळल्यामुळे २१ जण ठार झाले आणि ७८ जण जखमी झाले. मंगळवारी रात्री एका जखमी व्यक्तीचा मृत्यू होऊन मृतांची संख्या २२ झाली आहे. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आणि प्राथमिक उपचारानंतर १५ जणांना घरी सोडण्यात आले, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मुंबईत पत्रकारांना सांगितले.
मालाडमध्ये भिंत कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १५ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याने तिला बाहेर काढण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. तसेच मालाडमध्ये पावसात अडकलेल्या बंद कारमध्ये गुदमरून दोन जण मृत्युमुखी पडले. विलेपार्लेमध्ये विजेच्या धक्क्याने एकाचा तर मुलुंडमध्ये भिंत कोसळल्यामुळे एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे. पुणे येथील आंबेगाव परिसरात देखील भिंत पडल्यामुळे सहा मजूर ठार आणि तीन जखमी झाले. ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे मंगळवारी सकाळी भिंत पडल्यामुळे तीन जण ठार झाले. बुलढाणा जिल्ह्यात वीज कोसळून ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर देखील खराब हवामानामुळे ५२ उड्डाणे रद्द केली गेली तर ५४ उड्डाणांत बदल करण्यात आले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. फडणवीस यांनी रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक आणि ज्या क्षेत्रांत जास्त मदत आणि सहाय्य आवश्यक आहे अशा विषयांचा आढावा घेतला. "सावधगिरीचा उपाय आणि हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता मंगळवारी सुट्टी जाहीर केली," असे फडणवीस म्हणाले. तसेच पुढील दोन दिवस सतर्क राहण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
बीएमसी अधिकाऱ्यांनुसार आज हि पाऊस पडत असल्याने विमानतळ कॉलनी, वाकोला जंक्शन, पोस्ट कॉलनी, चुनाबत्ती रेल्वे स्थानकाजवळ व वाकोला रोड येथे पाणी साचले आहे. मिठी नदी दुथडी भरून वाहत असल्याने कोणतिही अप्रिय घटना टाळण्यासाठी क्रांती नगर, कुर्ला येथून १००० हून अधिक जणांना हलविण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठाने पहिल्या आणि द्वितीय वर्षाच्या बीएस्सी संगणक विज्ञानच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
मध्य रेल्वे (सीआर) अधिकार्याने सांगितले की आरपीएफ जवानांच्या मदतीने रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्थानिक गाड्यांमध्ये अडकलेल्या हजारो प्रवाशांना वाचवले आणि त्यांना स्टेशन वर चहा, बिस्किटे आणि इतर खाद्य पदार्थ पुरवले.
पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, वारंवारता कमी झाल्या तरीही उपनगरीय चर्चगेट ते विरार दरम्यान असलेली लोकल सेवा चालू होती. जोरदार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या किंवा अंतिम गंतव्य स्थानापूर्वी बंद करण्यात आल्या.
सावधगिरीची उपाययोजना म्हणून मुंबईच्या काही उपनगरीय भागात वीज पुरवठा देखील बंद करण्यात आला होता.
मुसळधार पावसामुळे फडणवीस यांना महापालिकेच्या नव्या इमारतीच्या भूमी पूजनाचा कार्यक्रम रद्द करावा लागला. मालाडच्या भिंत कोसळण्याच्या घटनेची चौकशी सुरू करण्यात येणार असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी सांगितले. फडणवीस यांनी राज्य विधानमंडळातही मालाडच्या घटनेची चौकशी करण्याची घोषणा केली. मंगळवारी मान्सून सत्राच्या शेवटच्या दिवशी राज्य विधानसभेत मालाडच्या भिंत कोसळण्याच्या घटनेचा मुद्दा मांडण्यात आला होता. माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवसेना अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मुंबईसह संपूर्ण उत्तर कोकण मध्ये मान्सून सक्रिय असून, हवामान विभागाने बहुतेक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिला होता.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जोशी यांनी मुंबई आणि उपनगरात पुढील २४ तासांत पावसाची तीव्रता वाढेल असे सांगितले.
सोमवार सकाळी ८:३० पासून मंगळवारी सकाळी ८:३० पर्यंत बीएमसीच्या वेधशाळेने शहरात १६३ मिमी, पूर्वेकडील उपनगरात ३२९ मिमी तर पश्चिम उपनगरात ३०९ मिमी पावसाची नोंद केली. बीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर पाणी साचणे, भिंत कोसळणे, झाडाची फांदी कोसळणे अशा स्वरूपाच्या ३,५९३ तक्रारी आल्या आहेत.
"पुढील दोन दिवस आमच्यासाठी खूप कठीण आहेत आणि आमच्या यंत्रणा अतिवृष्टीदरम्यान कोणत्याही परिस्थितीत सामोरे जाण्यासाठी सज्ज आहेत," असे जोशी म्हणाले. बीएमसीच्या सर्व १४०० पाण्याचा निचरा करण्याचे पंप ५३ पूरप्रवण जागी ठेवण्यात आले आहेत, सहाय्यक महानगरपालिका आयुक्तांना देखरेख देखील करण्यास सांगितले आहे. बीएमसीची मान्सूनशी सामना करण्याची पूर्ण तयारी होती मात्र मुंबईची भौगोलिक रचना पाणी साचण्यास दोषी आहे असे जोशी म्हणाल्या.
"थोड्या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पाणी साचले गेले," असे आयएएस अधिकारी म्हणाले. मध्य रेल्वेने मंगळवारी दुपारी उशिरा आपली उपनगरीय सेवा पुन्हा सुरू केली त्यामुळे प्रवाशांना मदत झाली. खाजगी हवामान संस्था स्कायमेटने बुधवारी व शुक्रवारी मुंबईत "पूराचा धोका" असल्याचे सांगितले.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे