येणाऱ्या दिवसात कोकण आणि गोव्यात पाऊस, आगामी पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्याची दुष्काळी परिस्थितीतून सुटका
मुंबईसह कोकण आणि गोव्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. खरंतर, दमदार मान्सूनमुळे पावसाची कमतरता मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे आणि सध्याची परिस्थिती पाहता असे दिसून येते की लवकरच हा प्रदेश सरासरी पार करेल.
गेल्या २४ तासांत सांताक्रूज (मुंबई) मध्ये ३७५ मिमी पावसाची नोंद झाली असून डहाणूत १९३ मिमी, माथेरान मध्ये १८७ मिमी आणि महाबळेश्वर येथे १८४ मिमी पावसाची नोंद झाली.
आमच्या हवामानशास्त्रज्ञांच्या मते, ओडिसा वर असलेला कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राकडे सरकण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे, पुढील ४८ तासांत विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत विदर्भात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु आहे आणि साधारण ३ जुलै पर्यंत हा जोरदार पाऊस सुरु राहण्याची अपॆक्षा आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात विशेषतः उत्तर महाराष्ट्रात ३ व ४ जुलै रोजी मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दक्षिण मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या पावसाची शक्यता असून, प्रामुख्याने सांगली, सातारा, कोल्हापूरसारख्या ठिकाणी गडगडाटासह पावसाळी गतिविधींची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, दक्षिण मराठवाड्यातील सोलापूर आणि आसपासच्या भागात विखुरलेल्या पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. शिवाय, हा पाऊस विदर्भातील आणि मराठवाडाच्या दुष्काळग्रस्त भागांसाठी निश्चितच फायदेकारक ठरेल.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात मुसळधार पाऊस होत आहे. दरम्यान मुंबईकरांना ३ जुलैला पावसापासून थोडीशी उसंत मिळेल. तथापि, कमी दाबाच्या पट्ट्याचा जोर वाढण्याची अपेक्षा असून ४ किंवा ५ जुलै पासून पुन्हा पावसाचा जोर वाढेल. मात्र सध्या सुरु असलेल्या पावसाच्या तुलनेत तीव्रता कमी असेल.
स्कायमेटकडील उपलब्ध आकडेवारीनुसार १ जून ते १ जुलै दरम्यान, मध्य महाराष्ट्रात पावसाची तूट १८% (सामान्य श्रेणी), मराठवाड्यात ३४% आणि विदर्भात ४०% आहे. तथापि, आगामी पावसामुळे, आम्हाला अपेक्षा आहे की महाराष्ट्रातील हे तीनही विभाग सामान्य पावसाच्या श्रेणीत येतील. दरम्यान, कोकण आणि गोवा सरासरीपेक्षा अधिक श्रेणीत जाण्याची शक्यता आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे