[Marathi] येत्या २ – ३ दिवसात मुंबईत जोरदार पावसाची शक्यता

June 17, 2015 4:26 PM | Skymet Weather Team

मान्सून आल्यापासून मुंबई शहर मुसळधार पाऊस अनुभवत आहे. अजून काही दिवस मुंबई शहरात जोरदार पाऊस येतच राहील. आतापर्यंत मुंबईत जून महिन्यात सरासरी २३६ मिमी पावसाची नोंद झाली असून अजूनपर्यंत संपूर्ण जून महिन्याच्या सरासरीपासून (५२३ मिमी ) हा आकडा खूपच दूर आहे पण तरीही मान्सून आल्यापासून जोरदार पाऊस झाल्यामुळे कमी वेळात सरासरीच्या निम्म्यापर्यंत हा अंक आला आहे.

खूप प्रतीक्षेनंतर अखेरीस १२ जून ला मान्सून मुंबईत दाखल झाला. मान्सुनने थोडाशी उशिरा जरी हजेरी लावली असली तरी मान्सून आल्यापासून शहरात चांगला पाऊस येतो आहे.

भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागानुसार पश्चिम किनारपट्टीजवळ जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्यामुळे मुंबईत सतत मान्सून सक्रीय राहण्यास मदतच होणार आहे. या प्रणाली मुळे येत्या २ ते ३ दिवसात मुंबईत जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र थोड्या काळासाठी पावसाची तीव्रता कमी होताना दिसेल.

आंध्रच्या किनारपट्टीजवळ जे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे ते पश्चिमेकडे सरकल्यावर मुंबईत पुन्हा जोरदार पावसाची सुरु होणे अपेक्षित आहे. आणि हा पाऊस झाला कि जून महिन्याची पावसाची सरासरी सहजपणे गाठली जाईल. या पावसाने उष्णतेपासून जरी सुटका झाली असली तरी शहरात आर्द्रतेची पातळी मात्र कमालीची वाढली आहे. गेल्या आठवड्यात आर्द्रता ५५ टक्के होती आणि मंगळवारी पातळी वाढून ९१ टक्के झालेली आहे. असे असले तरी आल्हाददायक सागरी वाऱ्यांमुळे मुंबईकरांची रात्र मात्र सुखावह जात आहे.

 

Image Credit: Indiatoday

OTHER LATEST STORIES