गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण भारतात उष्ण लहरीच्या तडाख्यामुळे जवळजवळ १००० लोकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. तेलंगाणा आणि आंध्रप्रदेशात तसेच मध्य आणि पूर्व भारतात तर उष्णतेने आपले रुद्र रूप धारण केलेले दिसून येत आहे. भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मे महिना हा संपूर्ण भारतासाठी अतिशय उष्ण महिना असल्याचे दिसून आले आहे. या काळात सर्वसाधारणपणे हवामान प्रणालींचे प्रमाणही खूप कमी असते. स्थानिक हवामानात बदल होऊन धुळीचे वादळ, पाऊस आणि गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता असते. सध्या जी उष्णतेची लाट आली आहे तीसुद्धा या महिन्यात खूप काळ टिकून असल्याचे दिसून येत आहे.
या उष्ण लहरीमुळे गेले दहा दिवस देशातील बऱ्याच भागात कमाल तापमान ४५ अंश से. च्या जवळपासच आहे. जेव्हा सरासरी कमाल तापमानापेक्षा ५ अंश से. ने कमाल तापमानात वाढ होते तेव्हा त्या भागात उष्ण लहर असल्याचे लक्षात येते.
उत्तर भारतातील तापमान :
सध्यस्थितीत बऱ्याच ठिकाणी असह्य करणारी गरमी आणि तापमान आहे. मंगळवारी हरियाणातील कर्नाल येथे कमाल तापमान ४४ अंश से. होते, हे तापमान सरासरी तापमानापेक्षा ४ अंश से. ने जास्त होते. पटियाला येथेही कमाल तापमान ४२.४ अंश से. होते तसेच देशाची राजधानी दिल्ली येथे तर भयानक उष्णता असून तेथील कमाल तापमान ४५.५ अंश से. होते. हि नोंदही सरासरी कमाल तापमानाच्या नोंदीपेक्षा ५ अंश से. जास्त असल्याने येथेही उष्ण लहर सदृश वातावरण आहे.
पूर्व आणि मध्य भारतातील तापमान :
तेलंगाणा आणि आंध्रप्रदेशानंतर पूर्व आणि मध्य भारतात जीवाची काहिली करणारी उष्णता आहे. या भागातही बऱ्याच ठिकाणी उष्ण लहरीचा तडाखा बसलेला आहे. उदाहरणच बघायचे झाल्यास झारखंडमधील डाल्टनगंज येथे मंगळवारी ४६.८ अंश से. कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. ओडीशातील झारसुगुदा येथेही ४६ अंश से. कमाल तापमान होते तसेच छत्तीसगड येथील रायपुर आणि महाराष्ट्रातील नागपूर येथे अनुक्रमे ४६.१ अंश से. आणि ४६.२ अंश से. कमाल तापमानाची नोंद करण्यात आली.
पश्चिम भारतातील तापमान :
देशतील पश्चिम भागातही तापमानात वाढ झालेली आहे. मंगळवारी राजस्थानातील कोटा येथे ४५.८ अंश से. कमाल तापमान होते तसेच राज्याची राजधानी जयपूर येथेही ४४.७ अंश से. कमाल तापमान होते. अहमदाबाद येथे ४३.९ अंश से. कमाल तापमान असून काही अंशी कमी असल्याचे दिसून आले.
हवामानाचा अंदाज :
भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागाच्या अभ्यासकांनुसार देशातील बऱ्याच भागात अजून ४ ते ५ दिवस असेच तापमान असण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात आणि दिल्ली येथे येत्या २४ ते ४८ तासात धुळीचे वादळ आणि पावसाची शक्यता असली तरी त्याची तीव्रता फारशी नसल्याने वातावरणात फारसा बदल होणार नाही.
तसेच नैऋत्य दिशेकडून अरबी समुद्रावरून येणाऱ्या हवेमुळे येत्या २४ तासात गुजरात आणि राजस्थान या पश्चिम व उत्तरेकडील भागात २ ते ३ अंश से. ने तापमानात घट होण्यास सुरुवात होईल.
Image Credit: hindustantimes.com