स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार, गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात पावसाळी गतिविधी कमी झाल्या असून विदर्भात मध्यम पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्याच्या काही भागात पावसाचे प्रमाण बरेच कमी झाले आहे.
या उलट कोकण आणि गोव्यामध्ये पावसाच्या तीव्रतेत अजिबात बदल झाला नसून डहाणू व लगतच्या भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. गेल्या २४ तासांत सांगली, सातारा आणि कोल्हापूर या मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
आमच्या हवामानतज्ञांनुसार, आता किनारपट्टीवरील ट्रफ रेषा कमकुवत झाली आहे, परंतु अरबी समुद्राकडून कोकण आणि गोव्यात जोरदार पश्चिमी वारे वाहत आहे. त्यामुळे अजून काही दिवस दक्षिण कोकण आणि गोव्यात काही मुसळधार सरींसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तथापि, मुंबईमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची सध्यातरी शक्यता नाही.
दरम्यान ४ ऑगस्ट पर्यंत मुंबई आणि उपनगरात गडगडाटासह थोडया पावसाची शक्यता आहे परंतु त्यामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही. ५ ऑगस्टनंतर मात्र हवामान जवळजवळ कोरडे होईल अशी अपेक्षा आहे.
पुण्याबद्दल बोलायचे झाल्यास शहरात गेल्या आठवड्यापासून चांगला पाऊस पडत आहे. परंतु, आता पावसाची तीव्रता कमी होईल आणि केवळ काही ठिकाणीच पावसाळी गतिविधी दिसतील. ४ ऑगस्ट च्या सुमारास शहरात पुन्हा चांगला पाऊस पडेल तसेच या काळात तुरळक ठिकाणी मुसळधार सरींसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, २ ऑगस्ट पर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात कमी तीव्रतेसह पाऊस सुरू राहील. ४ ऑगस्ट पासून मात्र पावसाच्या तीव्रतेत पुन्हा एकदा वाढ होईल आणि तुरळक ठिकाणी जोरदार सरींसह मध्यम पावसाची शक्यता आहे. याच काळात कोकण आणि गोव्यामध्ये पावसाची तीव्रता वाढेल आणि रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
प्रतिमा क्रेडीट: www.mariagegironde.com
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे