सक्रिय झालेल्या दक्षिण-पश्चिम मान्सूनमुळे गेल्या २४ तासांत दक्षिण कोकण आणि गोवा येथे मुसळधार पाऊस झाला आहे. तर मुंबईसह कोकणच्या उत्तर जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला आहे.
रत्नागिरीमध्ये २४ तासांच्या कालावधीत २८० मिमी इतका प्रचंड पाऊस नोंदला गेला आहे. या पावसामुळे हे देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण ठरले आहे. जुलै महिन्यातील २४ तासांत सगळ्यात जास्त पाऊस (३०४. ४ मिमी) २८ जुलै १९०० रोजी नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, दक्षिण मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस पडला असून साताऱ्यामध्ये २० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे तर पुणे, नाशिक आणि अहमदनगरमध्ये हलक्या पावसाची नोंद झाली आहे. सोलापूर आणि वर्धा येथे काही तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे.
गेल्या २४ तासांत सोमवार सकाळी ८:३० पासून हर्णे मध्ये ७९ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तसेच अलिबागमध्ये ४५ मिमी, वेंगुर्लामध्ये २९ मिमी, महाबळेश्वर येथे १५ मिमी, कोल्हापूरमध्ये ५ मिमी, कुलाबामध्ये (मुंबई) ४ मिमी तर नाशिकमध्ये २ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
स्कायमेटनुसार, पावसाळी गतिविधी आता उत्तर कोकण आणि गोव्यावाकडे सरकेल त्यामुळे या क्षेत्रांसह मुंबई मध्ये आज संध्याकाळपर्यंत पावसाच्या काही सरी पडतील. या पावसाळी गतिविधीत हळूहळू वाढ होईल आणि त्यामुळे मुंबई आणि उपनगरात २५ जुलै पासून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान,पुढील २४ तासामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हवामान कोरडे राहणार असून काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. या भागांत २५ जुलैपर्यंत पावसात वाढ होणार असून २७ आणि २८ जुलै रोजी पावसात लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. दुसरीकडे, मध्य महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आठवड्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडेल.
२२ जुलै रोजी महाराष्ट्रात पावसाची कमतरता ८% इतकी आहे. कोकण,गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अनुक्रमे ११% आणि ९% इतके पावसाचे आधिक्य आहे. तर विदर्भ व मराठवाड्यात अनुक्रमे ३०% आणि ३८% इतकी पावसाची कमतरता आहे. तथापि, आगामी पावसामुळे या दोन विभागांमध्ये पावसाची कमतरता काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते.
प्रतिमा क्रेडीट: हिंदुस्तान टाइम्स
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे