[Marathi] संभाव्य कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस

July 25, 2019 2:33 PM | Skymet Weather Team

गेल्या २४ तासांत कोंकण आणि गोवा तसेच मुंबई, ठाणे, डहाणू, पालघर आणि अलीबाग येथे मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली आहे. तर मध्य-महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर आणि सातारा याठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नोंदला गेला आहे.

दरम्यान, विदर्भातील काही भागात पावसाचे प्रमाण वाढले असून अकोला, वाशिम व वर्धा या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली आहे. तथापि, मराठावाड्याचा बहुतांशी भाग अजूनही पावसापासून वंचित राहिला आहे.

गेल्या २४ तासांत अलीबागमध्ये १३३ मिमी पावसाची नोंद झाली, तर माथेरानमध्ये ८८ मिमी, रत्नागिरीमध्ये ८० मिमी, महाबळेश्वरमध्ये ६९ मिमी, कुलाबामध्ये (मुंबई) ५२ मिमी, डहाणूमध्ये ४६ मिमी, हर्णे मध्ये ४२ मिमी, सांताक्रूझमध्ये (मुंबई) ३८ मिमी, अकोलामध्ये २२ मिमी आणि नाशिकमध्ये ११ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.

सध्या, आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारी भागांत चक्रवाती परिभ्रमण आहे. या प्रणालीमुळे उद्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही प्रणाली तेलंगाणा आणि विदर्भाकडे सरकेल त्यामुळे या दोन भागांत पावसाळी गतिविधीत वाढ होईल. अशाप्रकारे, २८ जुलैपर्यंत विदर्भ आणि मराठवाडा या भागांत एक ते दोन जोरदार सरींसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यानंतर या भागात पावसाचे प्रमाण कमी होईल मात्र मुंबईसह कोकण आणि गोव्यामध्ये काही जोरदार सरींसह मध्यम पावसाची शक्यता आहे. या कालखंडात, मध्य महाराष्ट्राच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे.

दक्षिण गुजरातमधील किनारपट्टीवरील ट्रफ रेषा आणि चक्रवाती परिभ्रमणामुळे गेल्या २४ तासांत मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. तथापि, पुढील २४ तासांत मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाळी गतिविधी कमी होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर २७ जुलैच्या आसपास पावसाचा वेग वाढेल आणि या काळात बऱ्याच ठिकाणी काही मुसळधार सरींसह मध्यम पावसाची शक्यता आहे. जोरदार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी सखल भागात पाणी साचण्याची तसेच वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू शकते. मुंबईमध्ये लोकल आणि रेल्वेला विलंब होऊ शकतो. म्हणूनच मुंबईकरांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

प्रतिमा क्रेडीट: द इंडियन एक्सप्रेस

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES