गेल्या २४ तासांत, महाराष्ट्रातील बहुतेक भागांमध्ये चांगला पाऊस पडत आहे. कोकण आणि गोवा येथे मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात एक दोन ठिकाणी जोरदार व उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. याउलट विदर्भावर मात्र विखुरलेला पाऊस नोंदवला गेला.
मागील २१ तासांच्या कालावधीत मुंबईमध्ये तब्बल २१७ मिमी पावसाची नोंद झाली. सलग दुसरी दिवशी पुण्यात जोरदार पाऊस कायम होता. पुण्यातील अनेक अपघातांमागे मुसळधार पाऊस हे देखील एक कारण आहे. शनिवारी पुण्यातील कोंढवा परिसरात ६० फूट भिंत कोसळली. या घटनेत किमान १५ लोक मृत्युमुखी पडले असून बचाव कार्य सुरु आहे.
दरम्यान कोकण आणि गोवा येथे किमान पुढील २४ तासांपर्यंत मुसळधार पाऊस सुरु राहण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईत ३० जूनपर्यंत एक दोन मुसळधार सरींसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
कोकण आणि गोव्यात सिंधुदुर्ग ते डहाणूपर्यंतच्या पट्ट्यात जोरदार पाऊस पडेल. तर अंतर्गत भागांमध्ये विखुरलेला पाऊस कायम राहील. विशेषतः पुढील २४ तास मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर राज्यावरील पावसाचा जोर थोडासा कमी होईल. परंतु लवकरच बंगालच्या खाडीवर विकसित होणारा कमी दाबाचा पट्टा पश्चिम दिशेने अंतर्गत भागात दाखल होईल. ज्यामुळे २ जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मध्यम ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच ३ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे एक दोन जोरदार सरींसह मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
दरम्यान ४ जुलै रोजी उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि गोवा येथे पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे. त्या दरम्यान डहाणू, ठाणे आणि मुंबईत मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
नंतर ५ जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरेल. ज्यामुळे, आपण असे म्हणू शकतो की ४ जुलै पर्यंत महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार आहे जो गेल्या १० वर्षांतील सर्वात कमी पाण्याच्या पातळीवर पोहोचलेल्या जलाशयांच्या पुनरुज्जीवनासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे