गेले काही दिवस महाराष्ट्र चढत्या पाऱ्याला सामोरे जात आहे. काल काही ठिकाणी झालेल्या तुरळक पावसामुळे या हैराण करणाऱ्या उकाड्या पासून सामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे तापमान थोडेफार कमी झालेले दिसून आले परंतु ज्या भागात पाऊस झालेला नाही तेथे मात्र तापमानात कमालीची वाढ झालेली दिसून आली.
गेल्या आठवड्यात विदर्भातील कमाल तापमानात ३ ते ४ अंश से. ने वाढ झालेली दिसून आली. ४ मे (सोमवार) रोजी नागपुरात ४०.५ अंश से. इतके तापमान होते. तर शुक्रवारी नागपूरचे दिवसाचे कमाल तापमान ४४.७ अंश से. होते, हे आत्तापर्यंतचे या उन्हाळ्यातील सर्वोच्च कमाल तापमान आहे. तसेच अकोला येथेही शुक्रवारी ४४.८ अंश से. तापमानाची नोंद करण्यात आली.
भारतातील स्कायमेट या हवामान संस्थेच्या अंदाजानुसार राज्यात १० मे च्या पुढे हलक्या पावसाची शक्यता असल्यामुळे वातावरणात थोडा गारवा निर्माण होईल. मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाडा येथे पावसाच्या हलक्या सरी पडतील. विदर्भात मात्र ११ मे रोजी पावसाची हजेरी लागेल. १३ मे पासून १५ मे पर्यंत याची व्यापकता वाढेल. या होणाऱ्या पावसाची तीव्रता कमी असल्या मुळे तापमानात मात्र थोडाच फरक जाणवेल.
भारतात याच कालावधीमध्ये म्हणजेच ११ मे च्या आसपास वेगवेगळ्या हवामान प्रणालिंमुळे तुरळक पावसाची शक्यता आहे. तसेच जम्मू काश्मीर येथे आलेल्या पश्चिमी विक्षोभामुळे उत्तर भारतात देखील ११ मे रोजी पावसाची शक्यता आहे. तामिळनाडूच्या किनारपट्टी जवळील समुद्रावर चक्रवाती हवेचे क्षेत्र तयार होत असल्याने दक्षिण भारतात सुद्धा पावसाची शक्यता आहे.
Image credit: indiatoday.in