गेले ४ ते ५ दिवस पुण्यात पावसाची रिमझिम सुरूच असताना रविवारी चांगल्याच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली असून या पावसामुळे हवेत छानसा गारवा येऊन वातावरण आल्हाददायक झाले आहे.
गेल्या २४ तासात पुण्यात ६०.२ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच दिवसाचे तापमान कमी होऊन २५ अंश से. च्या आसपास होते आणि किमान तापमानही २० अंश से पेक्षा कमी झालेले दिसून आले. येत्या ४८ तासात अजून पाऊस होणे अपेक्षित आहे.
अरबी समुद्रावरून येणारे पश्चिमी वाऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या पश्चिमी किनारपट्टीला जोरदार पाऊस होत असतो आणि या वाऱ्यांचा प्रभाव पुण्यावरही होत असतो. आठवडाभर पावसाचा लपंडाव अनुभवल्यानंतर पुणेकरांनी कालच्या मुसळधार पावसाचे आनंदाने स्वागत केले.
अजूनही २ ते ३ दिवस पुण्यात असाच पाऊस सुरु राहील फक्त पावसाची तीव्रता कमी जास्त होत राहील. तसेच काही भागात मुसळधार पाऊस होईल तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. पण कुठल्या न कुठल्या भागात पाऊस होत राहील आणि त्यामुळेच पुण्याचे आल्हाददायक वातावरण तसेच राहील.
यादरम्यान विदर्भातही चांगलाच पाऊस झालेला असून चंद्रपूरला रविवारी २०० मिमी पावसाची नोंद झाली असून विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात अजूनही मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या २४ तासात चंद्रपूर येथे ६७.३ मिमी, यवतमाळ येथे ४४ मिमी आणि अमरावती येथे ३८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.