यंदाच्या वर्षी मुंबईत मान्सूनची सुरुवात खूपच छान झाली. स्कायमेट या संस्थेकडे असलेल्या माहितीनुसार जून महिन्यात ११७४ मिमी पावसाची नोंद झाली. हि नोंद आतापर्यंतची सर्वात जास्त नोंद ठरली असून मुंबईत साधारपणे जून महिन्यात ५२३ मिमी पाऊस होतो.
परंतु जुलै महिन्यापासून मान्सूनच्या पावसाचा जोर कमी झाला. जुलै महिन्यात मुंबईत साधारपणे ८०० मिमी पाऊस होतो पण यंदा मात्र ३५९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हि नोंदसुद्धा गेल्या दहा वर्षातील आतापर्यंतची सर्वात कमी नोंद आहे.
ऑगस्ट महिन्यातही साधारपणे जुलै महिन्यासारखी परीस्थिती आहे. मुंबईतील सांताक्रूझ येथील वेधशाळेने मुंबईत ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत १०९.७ मिमी पावसाची नोंद केलेली असून हि नोंद मासिक सरासरीपेक्षा (५२९.७ मिमी) खूप कमी आहे. आणि आता महिन्याचे फक्त सहाच दिवस उरलेले आहेत आणि मासिक सरासरी भरून निघेल असे कोणतेच चिन्ह नाही.
ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत फक्त तीनच वेळा दोन आकडी पावसाची नोंद झाली आहे. स्कायमेट या संस्थेकडे असलेल्या माहितीनुसार मुंबईत ६ ऑगस्टला २२ मिमी ,१७ ऑगस्टला १२ मिमी आणि १८ ऑगस्टला ११ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आणि उरलेल्या दिवसात हलक्या आणि तुरळक पाऊस झाला आहे.
पश्चिम किनारपट्टी आणि मुंबईत मुख्यत्वे किनारपट्टी जवळील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनचा चांगला पाऊस होतो.परंतु यावर्षी मात्र हि हवामान प्रणाली तशी फारशी सक्रीय झाली नाही. म्हणूनच यंदा मुंबईत कमी पाऊस झाला.
तसेच येत्या ४८ तासात मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि या पावसामुळे या महिन्याची सरासरी भरून निघण्यास थोडीफार मदतच होईल.