[Marathi] उत्तर भारतात उष्ण आणि कोरड्या हवामानाला नव्याने सुरुवात

June 4, 2015 5:18 PM | Skymet Weather Team

उत्तर आणि वायव्येकडील भारतात मे महिन्यात सर्व ठिकाणीच उष्ण लहरीने बराच काळ आपला तळ ठोकला होता. जरी मधूनच पश्चिमी विक्षोभासारखी प्रणालीने आपली हजेरीदेखील लावली असली तरी तिची तीव्रता फारशी नसल्यामुळे या चक्रवाती क्षेत्राचा परिणाम राजस्थान आणि हरियाणा पर्यंत पोहचू शकला नव्हता आणि म्हणूनच पश्चिमेकडून येणारे कोरडे व उष्ण वारे बराच काळ येतच राहिल्याने तापमानात वाढ होतच गेली.

जून महिन्याच्या सुरुवातीलाच चांगल्या पश्चिमी विक्षोभमुळे राजस्थान आणि लगतच्या भागावर एक सशक्त चक्रवाती हवेचे क्षेत्र निर्माण झाले. राजस्थान, मध्य प्रदेशातील काही भाग, दिल्ली, हरियाणा आणि पंजाब येथे अरबी महासागराकडून येणाऱ्या आर्द्रता आणि चक्रवाती हवेचे अभिसरण होऊन याचे रुपांतर विस्तृत पाऊस आणि वादळी पावसात झाले.

आता पश्चिमी विक्षोभ पूर्वेकडे सरकला असून त्यामुळे निर्माण झालेल्या चक्रवाती हवेच्या क्षेत्राचा प्रभावही नाहीसा होईल. या भागात उत्तरेकडून किंवा वायव्येकडून नेहमी वाहणारे कोरडे आणि उष्ण वारे वाहण्यास पुन्हा सुरुवात होईल. त्यामुळेच उद्यापासून तापमानात वाढ होईल.

पण तरीही मे महिन्यात जशी तापमानात वाढ झाली होती तशी मात्र आता होणार नाही कारण दक्षिणेकडून येणारे तसेच मध्य पाकिस्तान आणि राजस्थानकडून येणारे वारे तापमानात फारशी वाढ होऊ देणार नाहीत.

येत्या ३ ते ४ दिवसात उत्तर आणि वायव्येकडील भारतात तापमानाचा पारा ४० अंश से. पुढेही जाऊ शकतो. पाकिस्तान आणि राजस्थानात आता आकाश निरभ्र असल्याने तिकडून येणाऱ्या वाऱ्यातही फारसा गारवा नसेल.

 

Image Credit: thehindu.com

OTHER LATEST STORIES