मुंबईमध्ये पावसाचा कहर झाला असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचे आगमन विलंबाने झाले तरी मुंबईत सुरुवातीपासूनच पाऊस मुसळधार असल्याने संपूर्ण शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरात संततधार सुरु असून काल रात्री अतिवृष्टी झाली. काल ची रात्र पावसाच्या झंझावातामुळे जुलै मधील सर्वाधिक पावसाची रात्र ठरू शकेल.
गेल्या २४ तासांत सांताक्रूझ वेधशाळेमध्ये ३७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे जी या दशकात सर्वाधिक आहे. यापूर्वी २००९ साली शहरात २७४.१ मिमी पाऊस झाला होता. तसेच २००५ साली शहरात २४ तासांच्या कालावधीत सगळ्यात जास्त ९४४. २ मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली होती.
मुंबईमध्ये गेल्या चार दिवसांपासून सतत जोरदार पाऊस कोसळत असून ७७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या रात्रीच्या मुसळधार पावसामुळे आणि आजच्या पावसाच्या अंदाजानुसार, शाळा आणि महाविद्यालये तसेच सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात आली आहे तसेच अनेक खाजगी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे.
पूर्व मालाडमध्ये भिंत कोसळल्यामुळे १३ जणांचा मृत्यू झाला आहे. नेवल टीम्स, एनडीआरएफ, फायर ब्रिगेड आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने १००० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. रस्त्यांवर पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
आज देखील मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडणार असून दुपार नंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे