३० सप्टेंबर पर्यंत नैऋत्य मान्सून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अक्षरशः उदासीनच होता. मान्सून पर्व संपेपर्यंत मध्य महाराष्ट्रात ३३% कमी पाऊस आणि मराठवाड्यात ४०% कमी पावसाची नोंद झाली होती. तसेच विदर्भातही १३% कमी पाऊस झाला होता.
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात चांगला पाऊस झाला असून त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाची कमतरता भरून निघण्यास मदत होते आहे. ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील बऱ्याच भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद होते.
रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात महाबळेश्वर येथे ५७ मिमी, अहमदनगर येथे २७ मिमी पावसाची नोंद झाली तसेच सोलापूर येथे २४ मिमी, सातारा येथे १४ मिमी, कोल्हापूर येथे ११ मिमी, अलिबाग येथे ७ मिमी आणि रत्नागिरी येथे ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मान्सूनची समाप्ती झाल्यावर या पावसामुळे काही भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. तसेच हा पाऊस रब्बी पिकांना सुद्धा फायद्याचा ठरलेला आहे कारण या पावसामुळे वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले असून जमिनीतील पाण्याची पातळी देखील वाढलेली आहे.
तसेच आता सुरु असलेला पाऊस २४ तासांनी कमी होईल असा अंदाज आहे. महाराष्ट्राची किनारपट्टी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागात अजुन २ ते ३ दिवस असाच पाऊस सुरु राहील. तसेच कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता दिनांक ९ ऑक्टोबर पासून पुन्हा वाढेल. तसेच मराठवाडा आणि विदर्भात पुढच्या आठवड्यात पावसाची तीव्रता कमी होताना दिसेल.