केरळमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या २४ तासांत कोची, आलप्पुझा आणि तिरुवनंतपुरम यासारख्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक राज्यात देखील चांगला पाऊस पडत आहे. मान्सूनच्या प्रारंभाच्या निकषाची पूर्तता आधीच पूर्ण झाली आहे. म्हणून, केरळ मध्ये लवकरच मान्सूनला सुरुवात होण्याची अपेक्षा आपण करू शकतो.
पुढील ४८ तासांत लक्षद्वीप परिसरात असलेल्या चक्रवाती परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण-पूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या केरळ मधील पावसाचा जोर अजून वाढेल. काही ठिकाणी जोरदार किंवा मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पुढच्या चार ते पाच दिवसांत केरळ मध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, कर्नाटक मध्ये सुरुवातीस पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असून काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कर्नाटकच्या किनारी भागांमध्ये १० जूनपासून पाऊस वाढेल. पुढील ४ ते ५ दिवसांत कर्नाटकमध्ये एक-दोन जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाच्या सरींची शक्यता आहे.
त्यामुळे, सध्या केरळमध्ये ५६% व कर्नाटकच्या किनारी भागात ७३% असलेली पावसाची तूट लवकरच भरून निघेल. पावसाचा जोर पाहता पुढील पाच ते सहा दिवसांत पाऊस सामान्यपेक्षा जास्त होऊ शकतो.
एकंदरीत आपण असे म्हणू शकतो की मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर केरळ आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये पाऊस जोरदार हजेरी लावेल.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे