[Marathi] मुसळधार पावसानंतर आता मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार

September 9, 2019 4:23 PM | Skymet Weather Team

मुसळधार पावसाचा अनुभव घेतल्यानंतर मुंबई व महाराष्ट्रातील बर्‍याच भागात आता पावसाचा जोर कमी झाला आहे. पावसाळी गतिविधींमध्ये आणखी घट होणार असून पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाळी गतिविधी कमी राहतील.

स्कायमेटच्या अंदाजानुसार महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या २४ तासात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात केवळ हलक्या ते मध्यम सरी नोंदल्या गेल्या. त्याचप्रमाणे कोकण आणि गोव्यातील एक-दोन जोरदार सरी वगळता पाऊस हलका ते मध्यम राहिला. मुंबईतही पाऊस मध्यम स्वरूपाचा होता व केवळ २६ मिमी पावसाची नोंद झाली.

दरम्यान, मराठवाड्यातील हवामान एक-दोन सरींसह प्रामुख्याने कोरडेच राहिले.

स्कायमेटच्या हवामानशास्त्रज्ञांनी महाराष्ट्रातील पावसाळी गतिविधींमध्ये आणखी घट होण्याची शक्यता वर्तविली आहे. मराठवाडा आणि लगतच्या भागात खूप कमी पावसाळी गतिविधी असतील. दरम्यान, विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात प्रामुख्याने गोंदिया, नागपूर, नाशिक आणि जळगाव येथे आणखी २४ तास विखुरलेला आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. तसेच याकाळात पुणे व त्याच्या आसपासच्या भागात केवळ हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान कोकण आणि गोव्यात पावसाचा जोर आणखी कमी होईल आणि मुंबईत केवळ हलक्या पावसाची शक्यता आहे. तथापि, पुढील दोन दिवस दक्षिण कोकण आणि गोवा येथे काही प्रमाणात मध्यम स्वरूपाचा पाऊस  पडण्याची शक्यता आहे.

पाऊस झपाट्याने कमी झाल्याने पुढील तीन ते चार दिवस संपूर्ण राज्यात पावसाळी गतिविधींचा अभाव निर्माण होईल.

१ जून ते ८ सप्टेंबर दरम्यान झालेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अनुक्रमे ५० आणि ५४ टक्के तर विदर्भात ४ टक्के पावसाचे आधिक्य राहिले आहे. तथापि, उपयुक्त पावसाच्या अभावामुळे मराठवाड्यात सरासरीपेक्षा १८ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

Image Credits – The Hindu Business Line 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES