गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि पश्चिम किनारपट्टीच्या भागात मान्सूनच्या लाटेची तीव्रता कमी झालेली दिसून येते आहे. जून महिन्यातील २३ दिवस संपत आले तरीदेखील मुंबईत तीन आकडी पावसाची नोंद अद्यापपर्यंत झालेली नाही.
तसेच गुरुवारी मुंबईत चांगला पाऊस झाला असून सांता क्रुझ वेधशाळेच्या नोंदीनुसार गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात २३ मिमी आणि कुलाबा वेधशाळेच्या नोंदीनुसार २० मिमी पावसाची नोंद झालेली आहे.
स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेनुसार मुंबई च्या किनारपट्टी लगत जो कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही आणि तो तसाच कर्नाटक आणि केरळच्या दिशेने पुढे सरकला. परंतु सध्या हा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झालेला असून त्याची तीव्रता पश्चिम किनारपट्टीला म्हणजेच दक्षिण गुजरातपर्यंत पसरली आहे.
[yuzo_related]
या सर्व परिस्थितीमुळे गेले ४- ५ दिवस पावसाची तीव्रता कमी झाली होती खरी परंतु कालपासून पुन्हा पावसाचा जोर वाढलेला आहे. याच दरम्यान तापमानात मात्र फारशी वाढ न झाल्यामुळे मुंबईतील वातावरण हे सुखद होते. या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम होऊन मुंबईत येत्या २ – ३ दिवसात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.
सेच हवामानाचा अभ्यासात उपयुक्त ठरणाऱ्या मॉडेल्स नुसार दक्षिण गुजरात आणि त्यालगतच्या उत्तर अरबी समुद्रात येत्या ४८ तासात चक्रवाती प्रणाली तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या चक्रवाती प्रणालीमुळे मुंबईत २७ जून च्या आसपास मुसळधार ते तीव्र स्वरूपाचा पाऊस होईल.
आतापर्यंत मुंबईत २३३.६ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. दरवर्षी पेक्षा हा पाऊस खूपच कमी आहे. मुंबईतील जून महिन्यातील सरासरी पाऊस ५८२ मिमी एवढा होत असतो. अजूनही महिना संपायला सात दिवस असल्याने हि तूट भरून निघेल असा अंदाज आहे.
मुंबई जून महिन्यातील पावसाच्या तीन आकडी नोंदी साठी प्रसिद्ध आहे. मुंबईत बऱ्याचदा एका दिवसात २०० मिमी पाऊस देखील नोंदला गेला आहे.