रविवारी मुंबईत झालेल्या रिमझिम पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे नैऋत्य मान्सूनचे आगमन लवकरच होणार अशी आशा निर्माण झाली होती, पण स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागानुसार भारताच्या आर्थिक उलाढालीसाठी महत्वाच्या मुंबई शहरात मान्सूनचे आगमन होण्यास अजून काही दिवस वाट बघावी लागेल. अरबी समुद्रात नुकत्याच झालेल्या अशोबा या चक्रीवादळामुळे मान्सूनपूर्व निर्माण होणाऱ्या वातावरणातही फारशी गती नसल्याचे आढळले आहे.
मार्च, एप्रिल आणि मे या मान्सूनपूर्व काळातही मुंबईत फारसा पाऊस झालेला नाही आणि आता जून महिन्यातही अजूनही हवा तसा पाऊस झालेला नाही. आतापर्यंत ७-८ जून ला फक्त ५.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळेच शहरातील हवामान अतिशय खराब झाले असून तापमानात तसेच आर्द्रतेत होणाऱ्या वाढीमुळे मुंबईकर खूपच हैराण आणि त्रस्त झाले आहेत.
महाराष्ट्रात बऱ्याच भागात तापमानात २ ते ३ अंश से. ने वाढ झाली असून या असह्य करणाऱ्या उकाडा आणि घामाच्या चिकचिकीपासून सुटका होण्यासाठी आता मुंबईकर अक्षरशः चातक पक्षासारखी मान्सूनची वाट बघत आहे. ९ जून ला मुंबईचे दिवसाचे कमाल तापमान ३६.४ अंश से. होते जे सरासरीपेक्षा ३ अंश से. जास्त होते तसेच नागपूर येथेही सरासरीपेक्षा २ अंश से. जास्त म्हणजेच ४१ अंश से. असे होते.
मुंबईत मान्सूनच्या हजेरीस उशीर
मुंबईत मान्सूनची हजेरी साधारणपणे १० जून ला होईल असे अपेक्षित होते परंतु याला आता ३ ते ४ दिवस उशीर होणार आहे. याला कारण म्हणजे अरबी समुद्रात निर्माण झालेले अशोबा हे चक्रीवादळ आहे, जे आता भारताच्या किनारपट्टीपासून दूर सरकले आहे आणि जाता जाता सोबत समुद्रातील आर्द्रता आणि हवा जी मान्सूनसाठी पूरक असते ती ओमानच्या दिशेकडे घेऊन पुढे गेले आहे. स्कायमेट या संस्थेनुसार पश्चिम किनारपट्टीला येणाऱ्या तीव्र नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मान्सून लवकरच दाखल होईल आणि येत्या २ ते ३ दिवसात मान्सूनपूर्व होणारा पाऊसही सुरु होईल आणि त्यानांतरच मुंबईत मान्सून दाखल होईल.
Image Credit: itimes.com