मुंबईकर ज्या मान्सूनची चातक पक्षासारखी वाट बघत होते तो आता मुंबईत दाखल झालेला आहे. स्वप्ननगरीत अखेरीस मान्सूनच्या पावसाचा शिडकावा झालेला आहे. या आठवड्यात झालेल्या वातावरणातील बदलामुळे सारखच पावसाचा लपंडाव सुरु होता आणि त्यामुळेच मान्सूनच्या आगमनाच्या सुखद बातमीला उशीर होत होता.
मुंबईत मान्सूनचे आगमन १० जूनलाच अपेक्षित होते पण मान्सूनने उशिरा हजेरी लाऊन जास्तीत जास्त भागांना जास्तीत जास्त पाऊस देण्याचे ठरवले आहे कि काय? असे म्हणायला काही हरकत नाही. भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागानुसार नव्याने आलेल्या मान्सूनच्या लाटेमुळे भारतीय पश्चिम किनारपट्टीला गेल्या २४ तासात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे यात महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा समावेश आहे. गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात मुंबईत ८२ मिमी पावसाची नोंद झाली असून यावरुन असे लक्षात येते कि मान्सून अगदीच मुंबईच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहचला आहे.
मुंबईतील बऱ्याच भागात म्हणजेच कांदिवली, जोगेश्वरी आणि खार या पश्चिम उपनगरात तसेच ठाणे, मुलुंड आणि घाटकोपर या पूर्व उपनगरात काल रात्री उशिरा पावसाची सुरुवात झाली. कुलाबा आणि सांताक्रूझ येथे अनुक्रमे २४ मिमी व ८२ मिमी पावसाची नोंद झाली.
रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील कमाल तापमानातही घसरण झाली असून १० जून ला कमाल तापमान २७.६ अंश से. वरून २३ अंश से. झाले होते.
Image Credit: Firstpost