आमच्या अंदाजानुसार जुलै महिन्याची सुरुवात जरी कमी पावसाने झाली तरी संपूर्ण महिना हा सर्वसाधारण पावसाचा जाईल. पण जुलै महिन्याचा आढावा घेण्यापूर्वी मला जून महिन्याविषयी बोलायला आवडेल. नैऋत्य मान्सूनने थोडी उशिरा हजेरी लावली. आणि तरीही संपूर्ण भारतात पाऊस होऊन जून महिन्याच्या सरासरीपेक्षा १६% जास्त पाऊस झाला.(एल निनोचा प्रभाव असणाऱ्या वर्षांपैकी यंदाच्या वर्षीचा जून महिन्यात सर्वात चांगला पाऊस झाला आहे.) सर्व साधारपणे पश्चिम राजस्थानात मान्सूनची हजेरी हि १५ जुलैच्या आसपास लागते पण यंदा मात्र मान्सूनची हजेरी २६ जूनलाच लागलेली आहे.
आम्ही एप्रिल महीन्यातच जून महिन्याच्या पावसाचा अंदाज सामान्य किवा त्यापेक्षा थोडा जास्त म्हणजेच १०७% असा दिला होता पण आमच्या अपेक्षेपेक्षा जास्तच पाऊस झाला. माझ्या माहितीनुसार ह्यावर्षी जून महिन्यात झालेला पाऊस हा गेल्या दशकातील भौगोलिक दृष्ट्या झालेला सर्वात चांगला पाऊस आहे. भारतातील चारही भागात सामान्य पाऊस झाला (भारतातील ९५ % भागात सामान्य किंवा त्यापेक्षा जास्तच पाऊस झाला आहे).
भारतात सर्व भागातील शेतात वेळेवर पेरणी झाली असून आतापर्यंत १६.५६ दशलक्ष हेक्टर शेतीत पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ३.१४ दशलक्ष हेक्टर म्हणजेच साधारणपणे एक चतुर्थांश जास्त भाग व्याप्त झाला आहे. आतापर्यंत २.३३ दशलक्ष हेक्टर शेतीत भाताची लागवड झालेली असून नेहमीपेक्षा ६ % कमी आहे ( उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये झालेल्या मान्सूनच्या उशिरा आगमनामुळे हि तुट निर्माण झाली आहे, पण माझ्या अपेक्षेप्रमाणे हि तुट जुलै मध्ये भरून निघेल), डाळींची लागवड १.१ दशलक्ष हेक्टर क्षेत्रात झालेली असून गेल्या वर्षीच्या १०० टक्के जास्त झाली आहे. तसेच तेलबीयांचीही लागवड २.७९ दशलक्ष हेक्टर झाली असून गेल्या वर्षीपेक्षा ४००% जास्त आहे. आणि इतर तृणधान्यांची लागवड १.९३ दशलक्ष हेक्टर झाली (गेल्यावर्षीपेक्षा १६ टक्के जास्त), कापूस लागवड पण ३.४८ दशलक्ष भागात झाली आहे (२० टक्के जास्त).
आता आपण जुलै महिन्याचा विचार करू, आमच्या एप्रिल महिन्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार १०४ टक्के सामान्य पाऊस होईल असा होता आणि आम्ही त्यावर ठाम होतो. आता जुलै महिन्यात सामान्यतः पाऊस हा सरासरीच्या १६ टक्क्यांनी वरखाली होत असतो. जुलै महिन्यात माझ्या अंदाजानुसार भारतातील उत्तर, पूर्व, पश्चिम आणि मध्य भारतात चांगला पाऊस होईल तसेच भारताचा दक्षिणी द्वीपकल्पाचा भाग मात्र कोरडाच असेल. अगदीच स्पष्टपणे सांगायचे असेल तर कर्नाटकाच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील आतला भाग, तामिळनाडू आणि मराठवाड्यात थोडा जास्त काळ कोरडाच असण्याची भीती आहे.
मान्सूनचा पाऊस जुलै महिन्यात मोठ्या कालावधीसाठी थांबून जाईल (मान्सून ब्रेक) अशी भीती व्यक्त केली जात आहे पण ह्या गोष्टीशी आम्ही सहमत नाही कारण आमच्या अंदाजानुसार मान्सून २ ते ६ जुलै दरम्यान मान्सून छोटीशी विश्रांती नक्कीच घेईल परंतु तो काळ फार मोठ्ठा नसेल. आमच्या अपेक्षेनुसार जुलै महिन्यात तीन वेळा पाऊस होईल (६ ते ८ जुलै, १४ ते १७ जुलै, २३ ते २६ जुलै) आणि चवथ्यांदा ३० जुलै ते २ ऑगस्ट असा असेल. पहिला टप्पा म्हणजेच ६ ते ८ जुलै या काळात उत्तर, मध्य आणि पूर्व भारतात पाऊस होईलपण त्याची तीव्रता खुप नसेल.
जून महिन्यातील पावसाला मेडन जुलिअन ऑसिलेशन (MJO) ची खूप मदत झाली आणि त्यामुळेच जून महिन्याच्या दुसऱ्या टप्प्यात चांगला पाऊस झाला.
यंदा एल निनो पण सशक्त असून तो विचारात घेऊनच आम्ही आमचा अंदाज दिला आहे. पण एल निनो हा एक चमत्कारिक प्रकार आहे. दरवेळेला येणारा एल निनो हा इतर झालेल्या एल निनो पेक्षा थोडा वेगळा असतो. या वेळेचा एल निनो हा गेल्या वर्षी सेप्टेंबर-ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१४ साली तीव्र झाला होता आणि नंतर फेब्रुवारी महिन्यात परत क्षिण झाला आणि नंतर परत वाढला. १९८६ आणि १९८७ साली सलग दोन वर्षे दुष्काळ पडला होता कारण त्या दोन्ही वर्षी एल निनोचा प्रभाव जास्त होता पण यंदा मात्र तसे झालेले नाही.
हिंदी महासागरातील द्विधृविकरण (IOD) सध्या तरी तटस्थ असला तरी ऑगस्ट महिन्यापर्यंत ते प्रभावी होईल आणि हि बाब मान्सूनसाठी खूप चांगली आहे.
मला अजून एक बाब आवर्जून सांगावीशी वाटते कि, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जर २०% ने पावसात तुट निर्माण झाली तरच २०१५ वर्ष हे दुष्काळाच्या छायेत जाईल. पण हे होणे अशक्य आहे. जरी जुलै, ऑगस्ट आणि सेप्टेंबर महिन्यात अनुक्रमे ८, १० आणि २० टक्के कमी पाऊस झाला तरी संपूर्ण ऋतूत दुष्काळ पडणे अशक्य आहे.
मी परत एकदा सांगू इच्छितो कि आम्ही एप्रिल महिन्यात जाहीर केल्या प्रमाणे अजूनही आमच्या अंदाजावर ठाम आहोत. यावर्षी सामान्य म्हणजेच १०२ टक्के पाऊस होणार यात आम्ही काही बदल करू इच्छित नाही. स्कायमेट नुसार २०१५ चा मान्सून हा सामान्यच असेल.
(हा लेख स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन सिंग यांच्या [CEO's Take] Monsoon forecast normal for July या लेखाचे भाषांतर आहे.)