गेल्या काही दिवसात सलग आलेल्या दोन पश्चिमी विक्षोभामुळे उत्तर भारतात चांगलाच पाऊस झालेला आहे. त्यामुळे उत्तर भारतातील तिन्ही राज्यातील डोंगराळ भागात भूस्खलन, पाणी साठून चिखल झाल्याचे समजते आहे. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडातील नद्या ह्या दुथडी भरून वाहत आहे आणि त्यांची पातळी धोक्याच्या पातळीजवळ आहे आतापर्यंत १० जणांनी या पाण्यात आपले प्राण गमावले आहे.
या पावसाचा परिणाम पर्यटन व्यावसायिकांवर झालेला दिसून येतो आहे कारण या भागात सध्या बरेच लोक फिरायला येणे टाळू लागले आहे. या भागातील बऱ्याच घरात तसेच दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे आणि त्यात भर म्हणून जागोजागी चिखल झालेला असून त्यामुळे दुर्गंधी पसरू लागली आहे. तसेच वातावरणातील या सर्व घडामोडींमुळे वर्षातून एकदाच होणारी अमरनाथ यात्राही थांबवावी लागली आहे.
रविवार सकाळी ८.३० पासून गेल्या २४ तासात जम्मूकाश्मीर येथील बनिहाल येथे ५२ मिमी, बातोट येथे ४५ मिमी, कोकेरनाग येथे ३० मिमी आणि पहलगाम येथे १९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडातील बऱ्याच भागात गेल्या २४ तासात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे ११ मिमी, शिमला येथे १२ मिमी आणि उत्तराखंडातील नैनिताल येथे २६ मिमी व पंतनगर येथे २८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पण हिमाचल प्रदेश आणि उत्तरखंडात आज १३ जुलै ला अजून पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच जम्मूकाश्मीर मधील हवामानात १४ जुलैला सुधारणा होण्याची शक्यता आहे. तरीही येत्या ३ दिवसात वातावरण तसे ढगाळ राहील आणि तुरळक पावसाची शक्यता मात्र आहे. या होणाऱ्या मुसळधार पावसामुळे जे पर्यटक तसेच यात्रेकरू या डोंगराळ भागात अडकले आहे त्यांच्यासाठी हवामानाच्या अंदाजाचा नक्कीच दिलासा मिळेल.
अजून एक पश्चिमी विक्षोभ भारतात १६ जुलैला दाखल होईल, सध्या हा पश्चिमी विक्षोभ अफगाणीस्तान आणि लगतच्या पाकिस्तानवर आहे. त्याचबरोबर मान्सुच्या कामिदाबाचा पट्टा जो उत्तर भारतातील डोंगरपायथ्यापर्यंत येऊन पोहचला आहे तो पण याच काळात सक्रीय होईल. आणि याचा परिणाम म्हणून १६ जुलैला संध्याकाळपासून उत्तर भारतातील डोंगराळ भागात पुन्हा जोरदार पाऊस सुरु होईल. आणि या पावसाची तीव्रता १७ व १८ जुलैला वाढेल. जम्मूकाश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात या आठवड्याच्या शेवटी जोरदार ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
Image Credit: himachallive.com