संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला मान्सूनचे आगमन झाल्यापासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यातही कोकण, गोवा आणि मुंबई या भागात जास्त प्रमाणात मुसळधार पाऊस सुरूच आहे. पश्चिम किनारपट्टीजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र आता सक्रीय झाले असल्यामुळे पश्चिम किनारपट्टी तसेच मुंबई, रत्नागिरी, गोवा आणि इतर ठिकाणी अतिशय जोरदार वृष्टी होते आहे.
पश्चिम किनारपट्टीजवळ जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्यात भर म्हणून गुजरात लगतच्या अरबी समुद्रात चक्रवाती हवेचे अभिसरण सुरु झाले आहे. हि हवामान प्रणाली पश्चिम किनारपट्टीला गेले ३ दिवस सक्रीय आहे. मुंबईत कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.
गेला आठवडाभर पश्चिम किनारपट्टीला संततधार पाऊस होतो आहे. या पावसाची तीव्रता जरी कमी जास्त असली तरी संपूर्ण सह्याद्री पर्वत रांगाच्या भागात पाऊस होतोच आहे.
गुरुवारी सकाळी ८.३० पर्यंत मुंबईत २८३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली हि नोंद गेल्या १० वर्षात जून मध्ये फक्त २४ तासात झालेल्या पावसाची सर्वात जास्त नोंद आहे. रत्नागिरी येथे १३५ मिमी, गोवा येथे १०२ मिमी, कारवार येथे ८९.४ मिमी, होनावर येथे ६१.८ मिमी, कोची येथे ४६ मिमी आणि मंगरूळ येथे ४४.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
या भागात राहणाऱ्या जनसामान्यांना या पावसामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच समुद्रात मोठ्या प्रमाणात भरती येणार असून यामुळे समुद्राचे पाणी शहरात शिरून परिस्थिती अजूनच बिकट होण्याची शक्यता आहे. मुंबईत जागोजागी पाणी साचल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली असून तेथील शाळाही बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहे.
अरबी समुद्रात निर्माणझालेली प्रणाली अजून पुढे काही दिवस सक्रीय राहणार असून त्यामुळे दक्षिण गुजरातमधील बऱ्याच भागात चांगलाच पाऊस होण्याची शक्यता आहे.
Image Credit: Mid day