सक्रिय मान्सूनमुळे गेल्या २४ तासात कोकण आणि गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस पडत आहे. विदर्भाच्या काही भागात मान्सूनची सामान्य स्थिती कायम आहे. याउलट, मराठवाडयात मान्सून कमी सक्रिय राहिला असून एक ते दोन मध्यम सरींसह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे.
स्कायमेटकडे उपलब्ध असलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत (गुरुवार सकाळी ८:३० पासून) महाबळेश्वरमध्ये २७३ मिमी (देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण) पावसाची नोंद झाली आहे तर माथेरानमध्ये १०४ मिमी, आणि साताऱ्यामध्ये ४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, मुंबईच्या काही भागात चांगला पाऊस पडला असून सांताक्रूझमध्ये ४३ मिमी तर कुलाबामध्ये २१ मिमी पाऊस नोंदला गेला. अधूनमधून विश्रांती घेत हा पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचण्याची किंवा वाहतूक कोंडीची समस्या उद्भवलेली नाही.
दरम्यान, मध्य महाराष्ट्रातही चांगला पाऊस झाला असून कोल्हापुरमध्ये २९ मिमी पाऊस पडला, तर पुण्यात १९ मिमी पावसाची नोंद झाली.
आमच्या हवामानतज्ञांनुसार, विदर्भात आजही मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची अपेक्षा आहे, तर येत्या २४ तासांत मराठवाड्यात पावसाची तीव्रता वाढेल.
मध्य महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, अहमदनगर आणि नाशिक या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये मध्यम तीव्रतेचा पाऊस पडेल. तथापि, एक किंवा दोन मुसळधार सरींची शक्यता नाकारता येत नाही.
पुण्याबद्दल बोलायचे झाल्यास रात्रीपासून शहरात मध्यम सरींनी हजेरी लावली असून ४ ऑगस्ट पर्यंत अशीच हवामानाची स्थिती राहण्याची आशा आहे. त्यानंतर पाऊस आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दक्षिण कोकण आणि गोवा तसेच लगतच्या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांत पावसाची तीव्रता मध्यम ते जोरदार असेल आणि ४ ऑगस्ट च्या सुमारास मुंबई, ठाणे आणि डहाणूसह उत्तर कोकण आणि गोवा येथे पावसाळी गतिविधींत वाढ होईल. तसेच या काळात एक किंवा दोन तीव्र ते मुसळधार सरींची शक्यता आहे.
प्रतिमा क्रेडीट: डीएनए इंडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे