रविवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास भारताच्या ईशान्येकडील आसाम या राज्यात ५.६ रिश्टर स्केल या क्षमतेचा भूकंपाचा हादरा बसला. या भूकंपामुळे अजून तरी काही जीवित हानी झालेली नाही.
या भूकंपाचे केंद्र हे कोक्राझार येथे असून त्याचे अक्षांश आणि रेखांश अनुक्रमे २६.५ अंश उत्तर आणि ९०.१ अंश पूर्व असे असून जमिनीपासून १० किमी खोल आहे.
भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागानुसार या भूकंपाची तीव्रता मध्यम स्वरुपाची होती. पूर्व भारत आणि शेजारील भूतान, बांगलादेश आणि नेपाळ येथेही भूकंपानंतर जाणवणारे हादरे जाणवले.
यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला गुवाहाटीत भूकंपाचे हादरे बसले होते आणि त्यानंतर काही दिवसातच नेपाळला भयंकर भूकंप झाला होता. भारतातील ईशान्येकडील भाग आता झोन ५ (ज्या भागात सर्वात जास्त भूकंप होतात) या जागतिक भूकंपाच्या पट्ट्यात सहाव्या क्रमांकावर आला आहे.
भारतातील ईशान्येकडील भाग हा भारतीय उपखंड, युरेशिअन (भूगर्भ) प्लेट आणि ऑस्ट्रेलियाची (भूगर्भ) प्लेट यांच्या सीमारेषेवर असल्याने खुपच भूकंप प्रवण आहे.