गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील काही भागात सातत्याने ४० अंश से. एवढे तापमान आहे. तसेच महाराष्ट्रातील पश्चिमी भागात वाढते तापमान नवीन उच्चांक गाठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मालेगाव तर सध्या उष्ण लहरीचा सामना करीत आहे.
वाचा: उष्ण लहर म्हणजे काय?
मराठवाडा आणि विदर्भात दिवसाचे तापमान हे सामान्य पातळीपेक्षा काही अंश वरच आहे. तसेच विदर्भातील यवतमाळ, वर्धा आणि नागपूर येथे सामान्य पातळीपेक्षा २ ते ३ अंश से. ने तापमानात वाढ झालेली दिसून येते आहे. मराठवाड्यातील परभणी आणि नांदेड येथेही २ अंश से. ने तापमानात वाढ झालेली आहे.
तीव्र उष्णता आणि वाढते तापमान यामुळे भिरा आणि अहमदनगर येथेही दिनांक २४ मार्चला गेल्या दहा वर्षातील सर्वात जास्त तापमानाची नोंद झालेली आहे. गुरुवारी जागतिक पर्यावरण संस्थेने २०१५ साल हे सर्वात जास्त उष्णतेचे होते असे जाहीर केले असून २०१६ चीही वाटचाल त्याच दिशेने होईल असा अंदाज आहे.
महाराष्ट्र का तापत आहे?
महाराष्ट्र आणि त्यालगतच्या तेलंगाणा, दक्षिण मध्य प्रदेश आणि राजस्थान या भागांवर एकही हवामान प्रणाली तयार होत नसल्याने या भागात उष्ण लहर सदृश्य वातावरण झाले आहे. महाराष्ट्रात असलेले मोकळे आकाश हे देखिल तापमान वाढीचे एक प्रमुख कारण आहे.
स्कायमेट या हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी येतील आणि त्यामुळे तापमानात काही अंशी घट होऊन वातावरण थोडे सुसह्य होईल. तसेच हा बदल फार काळ टिकणार नाही. जोपर्यंत एखादी सशक्त हवामान प्रणाली तयार होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राला उष्णतेचा सामना हा करावाच लागेल.