गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विखुरलेला पाऊस पडला आहे.
साधारणत: डिसेंबर महिन्यात कोरडे राहणाऱ्या मुंबईतही आश्चर्यकारकपणे पावसाची नोंद होत आहे. मागील २४ तासात १ मिमी पाऊस पडल्यामुळे शहरात डिसेंबरच्या सरासरी ०.२ मिमी पावसाच्या आकड्याला पार केले आहे. हा पाऊस मासिक सरासरीपेक्षा पाच पट जास्त आहे.
खरं तर पावसाच्या बाबतीत मुंबईसाठी हे वर्ष अपवादात्मक ठरलं आहे. जूनपासून, शहरात कमी अधिक प्रमाणात पावसाची नोंद होत आहे आणि आतापर्यंत कोणताही महिना असा गेला नाही, ज्यामध्ये शहरातील हवामान पूर्णपणे कोरडे राहिले आहे.
मागील २४ तासांमधील अवकाळी पावसाला पूर्व मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचा पट्टा कारणीभूत आहे असे आपण म्हणू शकतो. कालपर्यंत हवामान प्रारूपं असे दर्शवित होते की ही प्रणाली आणखी तीव्र होऊन चक्रीवादळामध्ये रूपांतरित होईल. तथापि, लवकरच थंड तापमान असलेल्या समुद्राच्या पृष्ठभागाच्या सामना करावा लागला आणि वातावरणातील दोन थरांच्या दरम्यान असलेल्या वाऱ्यांच्या वेगातील तफावत वाढली, ज्यामुळे हि प्रणाली कमकुवत होऊन कमी दाबाच्या पट्टा बनली. या प्रणालीची आणखी कमकुवत होण्याची आणि लवकरच कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.
आमच्या हवामानतज्ज्ञांच्या मते कमी दाबाच्या पट्ट्याने आपले सामर्थ्य गमावले आहे आणि म्हणूनच या प्रणालीचा महाराष्ट्रावर होणारा परिणाम आता उपेक्षणीय ठरणार आहे. परंतु मुंबईसह कोकण आणि गोव्यातील काही भागात हलका पाऊस पुढील २४ तास सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र हवामान कोरडे होईल.
या प्रणालीच्या प्रभावामुळे अरबी समुद्राकडून दमट वारे महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करीत होते आणि त्यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्याच्या काही भागात किमान तापमानात वाढ झाली होती. तथापि, ही प्रणाली आता कमकुवत झाली आहे आणि पावसाळी गतिविधी देखील कमी झाल्या आहेत. तसेच पुढील २४ तासांनंतर किमान तापमानातही घट होण्याची अपेक्षा आहे.
डिसेंबर महिन्यात मुंबईत पाऊस ही एक दुर्मिळ घटना आहे. गेल्या दशकात, जवळजवळ तीन वेळा असे घडले होते, ज्यात शहरात अवकाळी पाऊस पडला होता. डिसेंबर २००९ मध्ये, तुरळक हलक्या सरी नोंदविल्या गेल्या, तर डिसेंबर २०१४ मध्ये १.५ मिमी पाऊस पडला. तर ६ डिसेंबर २०१७ मध्ये सर्व विक्रम मोडत शहरात ५३.८ मिमी इतका जोरदार पाऊस पडला.
Image Credits – The Weather Channel
Any information taken from here should be credited to Skymet Weather