[Marathi] रत्नागिरीत धरण फुटले: सहा जण मृत; अनेक घरे वाहून गेली व किमान १६ जण बेपत्ता

July 3, 2019 7:06 PM | Skymet Weather Team

गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्याआधीच चिपळूण मधील तिवरे धरणाचा बांध तुटून काही मिनिटांतच गाव पुराखाली आले. मंगळवारी रात्री झालेल्या धरणफुटीमुळे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपलुण तालुक्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक घरे वाहून गेली आहेत. तसेच अजून सोळा जण बेपत्ता आहेत.

गेल्या दोन दिवसांत जोरदार पावसामुळे मंगळवारी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास धरण फुटण्याची घटना घडली. बेपत्ता लोकांची संख्या वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. धरणफुटीमुळे सात गावांशी संपर्क तुटला आहे, असे जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

रत्नागिरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिपळूण येथील तिवरे धरणातील बांधाला मंगळवारी संध्याकाळ पासून तडे जाण्यास सुरुवात झाली. गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्याआधीच तिवरे धरणाचा बांध तुटून काही मिनिटांतच गाव पुराखाली आले. धरणाजवळ असलेल्या वस्तीतून जवळपास १२ घरे वाहून गेली.

स्थानिक पोलिस, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशामक दल आणि स्थानिक गावकऱ्यांनी बेपत्ता लोकांचा शोध घेण्यास सुरवात केली आहे. बुधवारी सकाळी दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत.

पुणे मुख्यालयातील ५ व्या तुकडीचे एनडीआरएफ पथक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एनडीआरएफ पथक मंगळवारी रात्री घटनास्थळी पोहोचले असून एनडीआरएफ पथक स्थानिक प्रशासनासह चालू असलेल्या शोध आणि बचाव कार्यात सामील झाले आहे.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES