नुकतेच भारतीय हवामान खात्याने यंदा दुष्काळ होईल असे जाहीर केले आहे आणि त्यामुळेच देशातील शेतकऱ्यांचे आणि सर्व जनसामान्यांचे धाबे दणाणले आहे. पण दुष्काळ जाहीर होताच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी एक प्रायोगिक योजना महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केली, ती म्हणजे कृत्रिम पावसाची तरतूद. कृत्रिमरीत्या पाऊस पडणार म्हणजे नेमकं काय घडणार? सर्वसामान्यपणे पाऊस येण्यासाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते हे तर सर्वांना माहितच असते. सर्वात महत्वाचे म्हणजे बाष्पयुक्त घनदाट ढग जमले कि पाऊस येतो आतापर्यंत या सर्व गोष्टी नैसर्गिकरीत्या घडत होत्या आणि त्यावरच मानवाला अवलंबून राहावे लागत होते पण विज्ञान आणि तंत्रज्ञानाने या क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे.
कृत्रिम पावसाची निर्मिती:
कृत्रिम पावसाच्या निर्मितीसाठी सर्वात आधी ज्या भागात पाऊस असण्याची गरज आहे त्या भागावर साधे ढग असण्याची आवश्यकता असते आणि आपल्याला माहितच आहे कि कुठल्याही साध्या ढगातून पाऊस पडत नाही, त्यासाठी त्या ढगात खूप बाष्प असण्याची आवश्यकता असते. सर्वात प्रथम या ढगामध्ये अशा रसायनांचे बिजीकरण केले जाते कि ज्यामुळे त्यांची घनता वाढून त्यात पाण्याचे प्रमाण वाढेल व पावसाची निर्मिती होईल. या रसायनांमध्ये सिल्वर आयोडाईड, पोटॅशियम आयोडाईड आणि कोरडा बर्फ याचा वापर केला जातो या सर्वांमुळे बाष्पाची घनता वाढण्यास मदत होते. या रसायनांना हायाग्रोस्कॉपिक रसायने देखील म्हणतात सध्या यात सध्या मिठाचा पण वापर केला जातो. या पद्धतीत तेथे असलेल्या ढगातील पाण्याच्या थेंबाची आकार वाढून तो खाली पडण्यास मदत होते. आता हि घनता वाढते कशी? तर जी रसायने या ढगात बीजारोपण केली जातात ती रसायने त्या ढगात आधीच असलेल्या बाष्पाला चिकटून याचा आकार व वजन वाढवायला मदत करतात आणि मग पाऊस होतो.
कृत्रिम पावसाच्या मर्यादा:
१. या कृत्रिम पावसासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्या भागात पावसाची गरज आहे त्या भागावर ढग असले पाहिजे आणि ते ढग शोधण्यासाठी रडार यंत्रणा असायला हवी.
२. दुसरे म्हणजे त्या ढगांपर्यंत पोहचण्यासाठी विमान किंवा रॉकेटही असले पाहिजे म्हणजे त्याद्वारे ढगात रसायनांचे बीजारोपण करता येते.
३. तिसरे म्हणजे ढगांपर्यंत पोहचेपर्यंत ते ढग विरून जाण्याचीही दाट शक्यता असते.
४. तसेच ज्या ढगात बीजारोपण केले जाते त्या ढगात जर मूळस्वरुपात बाष्पाचे प्रमाण कमी असेल तर याचा काहीच फायदा होत नाही आणि पाऊस पडू शकत नाही.
५. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या ढगात आपण रसायनांचे बीजारोपण ज्या भौगोलिक प्रदेशासाठी करू त्याच भागात पाऊस होईल याची शक्यता फार धूसर असते.
एखाद्या गोष्टीचा जसा फायदा असतो तसाच त्याला मर्यादाही असतात.
सध्या अनेक हवामान संस्था आपापला मान्सून बद्दलचा अंदाज देत आहेत त्यात सारखे फेर बदलही करीत आहेत पण स्कायमेट हि एकच हवामान संस्था पहिल्यापासून त्यांच्या अंदाजाबाबत ठाम आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांसाठी हि एक मोठी आशा आहे. स्कायमेट ने वर्तविल्यानुसार सरासरी इतका पाऊस नक्कीच होईल आणि या प्रायोगिक कृत्रिम पावसाची फारशी गरज पडणार नाही अशी आशा करूया.
Image Credit: indianexpress.com