महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून गेल्या २४ तासांत महाबळेश्वरमध्ये २४१ मिमी पाऊस पडल्याने महाबळेश्वर सर्वाधिक पावसाचे ठिकाण ठरले आहे. बराच काळ पावसाअभावी कोरडे वातावरण असलेल्या मराठवाड्यातील बऱ्याच भागांतही या काळात चांगला पाऊस पडला आहे. दरम्यान, कोकण आणि गोवा येथे मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू असून मध्य महाराष्ट्रातील काही भागांत, विशेषत: सांगली, कोल्हापूर, सातारा, नाशिक आणि मालेगाव येथे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
गेल्या २४ तासांत रविवार सकाळी ८:३० पासून महाबळेश्वरमध्ये २४१ मिमी, रत्नागिरीमध्ये ६० मिमी, चंद्रपूरमध्ये ५८ मिमी, हर्णे मध्ये ४६ मिमी, साताऱ्यात ३४ मिमी आणि ब्रम्हपुरी येथे ३१ मिमी पावसाची नोंद झाली.
गेल्या २४ तासांत मुंबई, डहाणू आणि ठाणे येथे पावसाचा जोर कमी झाली असून कुलाबामध्ये केवळ ६.२ मिमी तर सांताक्रूझ येथे ०.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सध्या छत्तीसगड व त्यालगतच्या ओडिशावर चक्रवाती परिभ्रमण आहे. ही प्रणाली पुढे दक्षिण-पश्चिम दिशेने सरकेल आणि त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाळी गतिविधीत वाढ होईल. ३१ जुलै पर्यंत येथे चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.
त्यानंतर, पावसाची तीव्रता कमी होईल, मात्र हलका विखुरलेला पाऊस सुरूच राहण्याची अपेक्षा आहे. तसेच वातावरण आल्हाददायक राहील. पुढे ४ ऑगस्ट च्या आसपास विदर्भ आणि मराठवाड्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहरात देखील चांगला पाऊस पडत आहे. २८ जुलै रोजी, पुण्यात पावसाचे आधिक्य ८२% होते. शहरात सामान्य ४५४. ४ मिमी च्या तुलनेत (१ जून ते २८ जुलै) ८२७. ७ मिमी पाऊस पडला आहे. अजून पुढील दोन दिवस पुण्यामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे.
मुंबई शहरातही २८ जुलै रोजी पावसाचे आधिक्य २६% इतके आहे. तर १ जून ते २८ जुलै या कालावधीत मुंबईमध्ये सामान्य ११८६.२ मिमी पावसाच्या तुलनेत १४९२ मिमी पाऊस पडला आहे. मुंबईचा मासिक पावसाचा आढावा घेतला तर पाच वर्षांतील सर्वाधिक जुलै मधील पाऊस १२६८.४ मिमी इतका या वर्षी नोंदला गेला आहे. २०१४ मधील जुलै महिन्यात १४६८.५ मि.मी. इतक्या विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली होती आणि हा विक्रम मोडण्यासाठी मुंबईला आता फक्त २०० मिमी पावसाची गरज आहे.
दरम्यान मुंबईत पुढील दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता नाही, मात्र एक किंवा दोन मध्यम ते जोरदार सरींची शक्यता नाकारता येत नाही.
२८ जुलै रोजी मध्य महाराष्ट्र तसेच कोकण आणि गोवा येथे अनुक्रमे १९% आणि २४% पावसाचे आधिक्य आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात अजूनही पावसाची कमतरता आहे. तथापि, चांगल्या पावसाची शक्यता असल्याने पावसाच्या आकडेवारीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय पाणीटंचाई देखील काही प्रमाणात कमी होईल.
प्रतिमा क्रेडीट: एबीपी लाइव
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे