केरळमध्ये मान्सून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. कालपासून राज्यात अत्यंत मुसळधार पाऊस पडत असून पुढील तीन दिवस अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यातील पावसाळी गतिविधींवर स्कायमेट लक्ष ठेवून आहे आणि वेळोवेळी त्या संबंधित माहिती देखील प्रसारित करीत आहे. या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये स्कायमेटच्या स्वयंचलित हवामान केंद्राचे दाट जाळे आहे जे अचूक हवामानाची माहिती प्रदान करते. उदाहरणार्थ, एर्नाकुलम जिल्ह्यातील अलुवा तालुक्यातील आमच्या स्वयंचलित हवामान केंद्राने ६१.२ मिमी पावसाची नोंद केली आहे तर त्रिशूरमधील चालकुडी तालुक्यात ५६.६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. उपग्रह प्रतिमांनुसार, राज्य घनदाट ढगांनी आच्छादलेले आहे. दोन हवामान प्रणाली देखील पाहिल्या जाऊ शकतात, त्यातील एक दक्षिण कोकणपासून केरळ पर्यंत विस्तारणारी ट्रफ रेषा आहे आणि दुसरी उत्तरपश्चिमी बंगालच्या खाडी आणि लगतच्या ओडिसा आणि आंध्र प्रदेशच्या भागांवर असलेली एक चक्रवाती प्रणाली आहे. या चक्रवाती प्रणालीमुळे उत्तर आंध्रप्रदेश, दक्षिण ओडिसा आणि लगतच्या खाडीमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या दोन प्रणालींच्या एकत्रित परिणामामुळे केरळमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आणि ढगांचे प्रमाण वाढले आहे.
आलप्पुझा आणि पुनालूर, दक्षिण कोचिन आणि कोझिकोड तसेच राज्याच्या अंतर्गत भागातही पाऊस नोंदवला गेला आहे. गेल्या २४ तासांत अनेक ठिकाणी तीन-अंकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. कोझिकोड, करिपूर, कोचीन, आलप्पुझा, पुनालूर आणि कन्नूर येथे अनुक्रमे १५० मिमी, ११८ मिमी, ११६ मिमी, ९७ मिमी, ५७ मिमी आणि ८५ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे.
हवामानशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, दीर्घकाळ पडणाऱ्या जोरदार पावसामुळे धरणे आणि जलाशयांवर परिणाम होण्याची शक्यता असून केरळमध्ये पुराचा धोका संभवतो. काही ठिकाणी ५०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस नोंदविला जाण्याची शक्यता देखील आहे.
प्रतिमा क्रेडीट: द इंडियन एक्सप्रेस
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे