उत्तर भारतातील बहुतांश डोंगराळ भागात मुसळधार आणि जोरदार पाऊस सुरु आहे. या भागातील खराब हवामानामुळे अमरनाथ यात्राही काही काळासाठी थांबविण्यात आली आहे. तसेच उत्तर काश्मीरमधील बलताल आणि दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथील यात्रेकरुंना पटनीटोप येथे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
अमरनाथ येथील पवित्र गुहा आणि त्या मार्गावर होत असलेल्या जोरदार पावसामुळे यात्रा काही काळासाठी थांबवण्यात आली आहे. तसेच ९ जुलैला झालेल्या जोरदार पावसामुळे रामबन या शहरात भूस्खलनामुळे जम्मू ते श्रीनगर हा महामार्ग बंद करण्यात आला आहे. यात्रेकरूंच्या छावणी पासून जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांवर संततधार पाऊस चालूच आहे. वातावरणात थोडीफार सुधारणा झाल्यावरच अमरनाथची यात्रा पुन्हा सुरु होईल.
९ जुलै पर्यंत तब्बल एक लाख भाविकांनी अमरनाथ गुहेतील शिवलिंगाचे दर्शन घेतलेले आहे.
या डोंगराळ भागातील राज्यात गेल्या २४ तासात झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे
या होणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरची दृश्यमानताही कमी झाली असल्याने प्रवास करण्यात मोठे अडथळे निर्माण होत आहे. असाच संततधार पाऊस अजून बराच काळ सुरु राहिला तर भूस्खलनाचा धोकाही निर्माण होऊ शकतो. अजून ३ ते ४ दिवस तरी पाऊस सुरु राहण्याची शक्यता आहे. अमरनाथची यात्रा पुन्हा सुरु होण्यासाठी हवामानात सुधारणा होणे आवश्यक आहे.
यादरम्यान मानसरोवरच्या यात्रेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे कारण या यात्रेच्या मार्गातही मान्सूनचा जोरदार पाऊस सुरु आहे. आणि अजूनही जोरदार पाऊस होणे अपेक्षित आहे.