गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडत आहे. विशेषतः कोकण आणि गोवा या भागात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडला आहे.
रत्नागिरी, हर्णे, सातारा, कोल्हापूर आणि नागपुरमध्ये मान्सूनची सक्रिय स्थिती आहे आणि त्यामुळे येत्या २४ तासांत या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
स्कायमेटकडे उपलब्ध असलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात शनिवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून महाबळेश्वर येथे ३८० मिमी, रत्नागिरीमध्ये २७१ मिमी, नाशिकमध्ये १५८ मिमी, कोल्हापूरमध्ये १०२ मिमी, सातारामध्ये ८५ मिमी, ठाण्यात ७७ मिमी, वेंगुर्लामध्ये ७४ मिमी, हर्णे मध्ये ७१ मिमी, सांगलीमध्ये ५२ मिमी आणि सांताक्रूझ (मुंबई) येथे ६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
अलीकडेच झालेल्या मुसळधार पावसामुळे विदर्भातील पावसाची कमतरता केवळ 3 टक्क्यांवर आली आहे. त्याचप्रमाणे चांगल्या पावसामुळे मराठवाड्याला सामान्य श्रेणीत येण्यास मदत झाली असून पावसाची कमतरता केवळ १८% (+/- १९% सामान्य श्रेणी आहे) आहे. दरम्यान, ४ ऑगस्ट पर्यंत कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे पावसाचे आधिक्य अनुक्रमे ४०% आणि ४८% आहे.
आमच्या हवामानतज्ञांनुसार उत्तर कोकण आणि गोवा तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी होईल. पावसाचे स्वरूप हलके राहणार असून मुंबई, डहाणू, नाशिक, अहमदनगर, मालेगाव आणि जळगाव येथे आणखी तीन दिवस मध्यम पावसाच्या सरी कोसळतील. तर दुसरीकडे, दक्षिण कोकण आणि गोवा तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अजूनही जोरदार पाऊस पडणार आहे, मात्र पावसाची तीव्रता कमी झाल्याने पुणे शहरात साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल.
शिवाय, उत्तर-बंगालच्या उपसागरात कमी-दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून ते हळूहळू पश्चिम दिशेने प्रवास करेल. तसेच, दक्षिण गुजरातपासून दक्षिण मध्य प्रदेशमधून उत्तर बंगालच्या उपसागरापर्यंत एक ट्फ रेषा विस्तारत आहे. या प्रणालीचा प्रभाव विदर्भावर दिसून येईल आणि पुढील दोन ते तीन दिवस विदर्भातील काही भागात चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, विदर्भाला लागून असलेल्या मराठवाड्याच्या काही भागांत देखील चांगला पाऊस पडेल.
प्रतिमा क्रेडीट: डीएनए इंडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे