बुधवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वडोदरा शहरातील बहुतांश भागांत पूराची स्थिती निर्माण झाली आहे. विश्वामित्र नदी धोक्याच्या पातळी जवळ वाहत आहे. तीव्र पुरामुळे संपूर्ण शहर ठप्प झाले आहे आणि शेकडो कार्यालयीन कर्मचारी अडचणीत सापडले आहेत, काहींना तर पुराच्या पाण्यातून वाट काढत घरी परत जावे लागत आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आजवा धरणाच्या जलाशयाची पातळी २०९.७ फूट असून, २१४ फूटाची धोक्याची पातळी ओलांडण्यापासून फक्त ५ फूट कमी आहे. शिवाय विश्वामित्र नदीचे पाणी २३ फुटांवरून वाहत आहे.
वडोदरा रेल्वे स्थानकावर पाणी साचल्याने जवळपास १३ गाड्या रद्द करण्यात आल्या आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला मदतकार्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. परिस्थितीची गंभीरता पाहता सर्व सरकारी व खासगी शाळा गुरुवारी बंद ठेवण्याच्या सूचना वडोदरा जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
गेल्या २ तासांत मान्सून गुजरातच्या बर्याच भागात सक्रिय आहे. ज्यामुळे वडोदरा, वलसाड, सुरत, डॅग, भरूच आणि दमण, दादरा नगर हवेली आणि जामनगर व द्वारका येथे मुसळधार पाऊस पडला. तसेच सौराष्ट्र आणि कच्छ च्या काही भागात पावसाळी गतिविधी दिसून आल्या.
दरम्यान पावसाचा जोर आता कमी होण्याची शक्यता आहे. एक किंवा दोन तीव्र सरींसह हलका पाऊस आणखी २४ तास सुरू राहील. २ किंवा ३ ऑगस्ट दरम्यान या भागात पुन्हा एकदा मान्सून जोर पकडेल. या काळात मध्यम सरींची शक्यता नाकारता येत नाही. खरं तर, काही भागांमध्ये जोरदार सरींची शक्यता आहे. मात्र, पावसाचा जोर कालच्या तुलनेत कमी असेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.
प्रतिमा क्रेडीट: हिंदुस्तान टाइम्स
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे