[Marathi] चक्रीवादळ वायूच्या तडाख्यातून गुजरात बचावले, जोरदार वारा व पावसामुळे रेड अलर्ट

June 13, 2019 2:04 PM | Skymet Weather Team

काल रात्री स्कायमेटने वर्तविलेल्या अंदाजानुसार "वायु" चक्रीवादळाने दिशा बदलली असून आता गुजरातच्या किनारपट्टी जवळून जाणार आहे. तथापि, तीव्रतेत वाढ होवून हि प्रणाली आता द्वितीय श्रेणी टायफूनला तुल्यबळ झाली असून गुजरातकरीता "रेड अलर्ट" जारी करण्यात आलेला आहे.

हवामानतज्ञांच्या अनुसार, गुजरात चक्रीवादळ वायुच्या तडाख्यापासून वाचला असला तरी अतिवृष्टी आणि नुकसानकारक जोराच्या वाऱ्यामुळे संवेदनशील आहे. अमरेली, गिर सोमनाथ, दीव, जुनागड, पोरबंदर, राजकोट, जामनगर आणि द्वारका या भागात मुसळधार पावसाची शक्यता असून आसपासच्या परिसरात देखील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. अहमदाबाद, गांधीनगर आणि सुरेंद्रनगर या शहरात देखील चांगला पाऊस अपेक्षित आहे .

चक्रीवादळ वायु सध्या अक्षांश २०.३ अंश उत्तर आणि रेखांश ६९.५ अंश पूर्वेला उत्तरपूर्व आणि मध्य अरबी समुद्रात, दिवच्या १३० किमी दक्षिण-दक्षिणपश्चिम, वेरावळच्या नैऋत्येस ९० किमी आणि पोरबंदरच्या जवळजवळ १३० किमी अंतरावर स्थित आहे.

आज दुपारनंतर वाऱ्याचा वेग १३५ ते १४५ किमीप्रतितास होऊन काही काळ १६०किमीप्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. पुढील २४ तास समुद्र अतिशय खवळलेला असेल ज्यामुळे मच्छीमारांना व स्थानिकांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

"वायू" सौराष्ट्रला धडकणार नसून किनाऱ्याच्या खूप जवळून जाईल. दुपारनंतर किनाऱ्यापासून केवळ ८० ते १०० किमी अंतरावर वादळ असेल. यामुळे गुजरात किनाऱ्यावर याचा परिणाम होणार असून नुकसान देखील होण्याची शक्यता आहे, असे स्कायमेटच्या हवामानशास्त्र आणि हवामान बदल विभागाचे अध्यक्ष जी. पी. शर्मा यांनी सांगितले.

सर्वाधिक नुकसान कच्च्या घरांना अपेक्षित असून पक्की घरे देखील याला अपवाद नाहीत. झाडे, विजेचे खांब उन्मळून पडण्यामुळे जीवितासाठी संभाव्य धोक्याची शक्यता आहे. पिकांचे देखील नुकसान होवू शकते.

चक्रीवादळ वायु सध्या उत्तर-उत्तरपश्चिम दिशेने जात आहे आणि लवकरच गुजरातच्या किनारपट्टीवरून उत्तर-पश्चिम दिशेने वळेल. हवामानतज्ञांच्या अनुसार, गुजरातच्या किनारपट्टी जवळून गेल्या नंतर चक्रीवादळ वायूला उत्तर अरबी समुद्रावर स्थित विपरीत दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांचा सामना करावा लागेल, ज्यामुळे "वायू" ची पुढे प्रगती होणार नाही. तसेच, गुजरातचा तट आणि नंतर कराची पाकिस्तानच्या किनारपट्टीमुळे, वायू हळू हळूहळू कमकुवत होऊ लागेल.

तथापि, समुद्रात विलीन होण्याआधी अति तीव्र चक्रीवादळ वायु या क्षेत्राला कमीतकमी २ दिवस प्रभावित करणार आहे. ज्यामुळे १३ आणि १४ जून रोजी कराचीच्या किनाऱ्यावर जोरदार पाऊस पडेल. दरम्यान, १४ जूनपासून गुजरातमध्ये पावसाचा जोर कमी होईल परंतु काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES