[Marathi] मुसळधार पावसामुळे चंद्रपुर, गडचिरोली आणि नाशिकमध्ये पूरसदृश्य स्थिती

July 30, 2019 1:44 PM | Skymet Weather Team

विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात १३३ मिमी इतका प्रचंड पाऊस पडल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. खरं तर, गेल्या दशकातील मुसळधार पावसापैकी हा एक पाऊस ठरला आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली व नाशिक या शहरांमध्येही जोरदार पाऊस झाला आहे. २३५ मि.मी. इतका पाऊस झाल्याने महाबळेश्वर हे सलग दुसऱ्या दिवशी देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण ठरले आहे.

गेल्या पाच दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र पाटबंधारे विभागाने सोमवारी दुपारपासून गंगापूर धरणातून एक हजार घनफूट प्रति सेकंदाने गोदावरी नदीत पाणी सोडले आहे.

दरम्यान, कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांत सुद्धा जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडय़ातही गेल्या २४ तासांत चांगला पाऊस झाला आहे.

पावसाच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास गेल्या २४ तासांत सोमवार सकाळी ८:३० पासून माथेरानमध्ये १५१ मिमी, ब्रम्हपुरीमध्ये १०१ मिमी, ठाण्यात ९७ मिमी, कोल्हापुरमध्ये ८७ मिमी आणि सातारा येथे ६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार पुढील ४८ तासांत विदर्भ आणि मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार पाऊस सुरूच राहील. तसेच एक ते दोन जोरदार सरींसह कोकण आणि गोवा येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. परंतु मुंबईसह कोकण आणि गोव्यामध्ये पावसाची तीव्रता आता कमी होईल.

दरम्यान ४८ तासांनंतर महाराष्ट्रातील बऱ्याच भागांत पावसाचे प्रमाण कमी होईल. तथापि, १ ऑगस्टच्या सुमारास मॉन्सूनच्या नव्या लाटेमुळे कोकण आणि गोवा येथे परत पावसाची तीव्रता वाढेल, मात्र मुंबईत मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

जुलै महिन्यातील अखेरचा आठवडा संपूर्ण महाराष्ट्रासाठी पावसाळी गतिविधींबाबत अत्यंत चांगला ठरला आहे आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात देखील विश्रांती घेत पाऊस सुरु राहील. कोकण आणि गोवा तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचे आधिक्य झाल्याने हे दोन विभाग आता जास्त पावसाच्या वर्गात आहेत. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विदर्भ लवकरच सर्वसाधारण पावसाच्या विभागात प्रवेश करेल तसेच मराठवाड्यातील पावसाची कमतरता देखील नक्कीच कमी होईल.

प्रतिमा क्रेडीट: इंडिया.कॉम

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES