महाराष्ट्रात आलेल्या उष्ण लाटेमुळे जीवाची काहिली सुरु आहे. नागपुरात तर गेल्या दशकातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.
असल्या असह्य उष्णतेने महाराष्ट्रातील जनता हैराण तर झाली आहेच आणि त्यांच्या सहनशक्तीचाही अंत होऊ लागलेला आहे. कारण गेले काही दिवस मार्च महिन्यातच अनपेक्षितपणे तापमानात झालेली वाढ एक एक उच्चांक गाठत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात बऱ्याच भागात ४० अंश से. पेक्षा जास्त तापमानाची नोंद झालेली आहे.
या प्रकारची उष्णतेची लाट हि साधारणपणे एप्रिल व मे महिन्यात अपेक्षित असते परंतु यंदा मार्च अखेरीस अशी परस्थिती ओढवलेली आहे.
आमच्या वार्ताहरांनी दिलेल्या माहिती नुसार आतापर्यंत उष्माघातामुळे ५ जणांचा प्राण गेला आहे. ह्या जीवघेण्या उष्ण लहरीचा जास्त परिणाम मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात जास्त प्रमाणत दिसून येतो आहे.
महाराष्ट्रातील अकोला येथे सर्वाधिक म्हणजेच ४४ अंश से. तापमानाची नोंद झालेली आहे तसेच वर्धा ४४ अंश से.,चंद्रपूर येथे ४३.२ अंश से., ब्रम्हपुरी येथे ४३.१ अंश से., जळगाव येथे ४२.२ अंश से. आणि मालेगाव येथे ४२ अंश से. तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
तसेच महाराष्ट्रातील नागपूर येथेही उष्णतेच्या लाटे सदृश वातावरणाचा सामना तेथील नागरिक करत असून तेथेही ४३.३ अंश से. तापमानाची नोंद झालेली आहे. हि नोंद गेल्या दशकातील सर्वाधिक नोंद आहे.
याआधी नागपुरात मार्च महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद शंभर वर्षांपूर्वी म्हणजेच २८ मार्च १८९२ साली ४५ अंश से. अशी झालेली आहे. आणि त्यानंतर २२ मार्च २०१० आणि २३ मार्च २०१० मध्ये ४२.५ अंश से. तापमानाची नोंद झालेली आहे.
या भागात येणारी हि उष्ण आणि कोरडी हवा प्रामुख्याने उत्तर आणि वायव्य दिशेकडून येत आहे. भारताच्या मध्य भागातून उष्ण आणि कोरडी हवा महाराष्ट्रात येत असून भारतातील मध्य भागातही तापमानात कमालीची वाढ झालेली आहे. या हवेमुळेच महाराष्ट्रातही तापमानात वाढ होताना दिसून येते आहे.
स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेनुसार अजून काही दिवस असेच तापमान ४० अंश किवा अधिक असण्याची शक्यता आहे.
Image Credit: firstpost.com
Any information taken from here should be credited to skymetweather.com