[MARATHI] विदर्भात उष्ण लहरीचा कहर, वर्ध्यात तापमानाचा पारा ४७.५ अंश सेल्सिअस वर

May 21, 2015 4:55 PM | Skymet Weather Team
महाराष्ट्राला रणरणत्या उन्हापासून अजूनही विश्रांती मिळालेली नाही. नागपूर आणि वर्धा या शहरांना तर उष्ण लहरीचा चांगलाच तडाखा बसलेला असून या वर्षातील सर्वात जास्त कमाल तापमानाची नोंद येथे झालेली आहे. वर्धा येथे काल भारतातील सर्वात जास्त उच्चांकी तापमान होते.
विदर्भातील वातावरण
विदर्भातील काही शहरात असलेले कालचे कमाल तापमान पुढीलप्रमाणे
वर्धा (४७.५ अंश से.), नागपूर (४६.९ अंश से.), चंद्रपूर (४६.८ अंश से.), अकोला (४६.४ अंश से.), अमरावती (४५.६ अंश से.)
सध्या विदर्भावर कुठलीही हवामान प्रणाली नसल्यामुळे तेथील तापमानात आणि कोरड्या हवेत कमालीची वाढ झालेली आहे. विदर्भातील कमाल तापमान ४ ते ५ अंश से. नेहमीच्या सरासरीपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे.
विदर्भ आणि मराठवाडा हे कर्क वृत्ताजवळ असल्याने वर्षभरातील या दिवसात येथे तापमान जास्त असणे हे स्वाभाविकच आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाडा हे भारतात मध्यभागी असल्याने पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी पासून ते सारख्याच अंतरावर आहे त्यामुळे मध्य भारतात मोठ्याप्रमाणात हवामान प्रणाली उद्भवतच नाही आणि उत्तर आणि दक्षिणेकडील हवामान प्रणालींच्या परिणामांची तीव्रता लांबवर येईपर्यंत कमी होते.
पूर्व, दक्षिण किंवा उत्तर भारतात तयार झालेल्या चक्रवाती हवेच्या क्षेत्राचा पट्टा जर लांबला तर मध्य भारतात पाऊस होतो. येथे असलेल्या कमाल तापमानामुळे वातावरणात जरी छोटासा बदल झाला तरी मान्सूनपूर्व होणाऱ्या बदलांना वेग मिळतो आणि त्यामुळे गारपीट, सोसाट्याचा वारा आणि वादळी पावसाची शक्यता निर्माण होते. मात्र अशा प्रक्रिया वारंवार घडतीलच असे नाही. सध्यातरी मे महिन्यात गेल्या काही दिवसात नागपूर आणि वर्धा येथे अनुक्रमे १६ मिमी आणि ११ मिमी सरासरी पावसाची नोंद झालेली असून नागपुरात मे महिन्यात आतापर्यंत ३७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
(Featured Image Credit: stasiareport.com)

OTHER LATEST STORIES