नैऋत्य मान्सूनची गुजरातमधून रवानगी होताच तेथील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्यात या राज्यातील बऱ्याच भागात ४० अंश से. पेक्षा जास्त तापमान असतेच.
यंदा दिनांक ८ ऑक्टोबर रोजी वडोदरा येथे दिवसाचे कमाल तापमान ४०.६ अंश से. होते. ऑक्टोबर महिन्यातील हे तापमान गेल्या दशकातील सर्वात जास्त तापमान आहे. याआधी दिनांक १ ऑक्टोबर २००९ रोजी सर्वात जास्त तापमानाची म्हणजेच ४०.१ अंश से. अशी नोंद झाली होती. तसेच वडोदरा विमानतळावर देखील ४१.५ अंश से. तापमानाची नोंद झाली होती.
तसेच अहमदाबाद येथील वेधशाळेने गेल्या २४ तासात ३८.६ अंश से. तापमानाची नोंद केली असून तेथिल विमानतळावर ४१ अंश से. तापमानाची नोंद झाली आहे. याआधी या शहरात दिनांक २ ऑक्टोबर २००९ रोजी सर्वात जास्त म्हणजेच ३८.६ अंश से. तापमानाची नोंद झाली होती आणि त्यानंतर दिनांक १२ ऑक्टोबर २०१४ ला ३८.८ अंश से. तापमानाची नोंद झाली होती.
गुजरातच्या किनारपट्टीला देखील भरपूर उष्णता वाढलेली आहे. सुरात येथे ३७.५ अंश से. तापमानाची नोंद झाली आहे, हि नोंद देखील गेल्या दहा वर्षातील तिसऱ्या क्रमांकावर आहे. याआधी दिनांक २१ ऑक्टोबर २०१४ ला ४०.५ अंश से. तापमानाची नोंद झाली होती. तसेच दिसा येथेही मंगळवारी ४०.५ अंश से. तापमानाची नोंद झाली असून हे तापमानही गेल्या दहा वर्षातील तिसऱ्या क्रमांकावर आहे. याआधी दिनांक २ आणि ३ ऑक्टोबर २००९ ला सर्वात जास्त अर्थात ४१.२ अंश से. तापमानाची नोंद झाली आहे.
सध्या राज्यात उष्ण लहर आल्यासारखेच वातावरण आहे कारण बऱ्याच शहरातील तापमान साधारण पातळीपेक्षा ५ अंश से. ने जास्त आहे. राज्यातील किमान पातळीत मात्र खूपच फरक आहे. संध्याकाळच्या वेळी छान आल्हाददायक वातावरण असते आणि सूर्यास्तानंतर तापमान कमी होऊन २० अंश से. च्या आत स्थिरावते. कमाल आणि किमान तापमानात साधारणपणे १५ ते १७ अंशाची बरीच मोठी तफावत आहे.
राज्यातील किमान तापमानाची पातळी हि आटोक्यात असल्याने एकीकडे संध्याकाळच्या वेळी कोरडी हवा आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद येथील रहिवासी घेत आहेत. आणि दुसरीकडे मात्र दुपारची गरमी त्रस्त करीत आहे. असे वातावरण साधारणपणे अजून दोन दिवस तरी असेल असा अंदाज आहे. त्यानंतर यातून सुटका नक्कीच होईल.