गेले ४ ते ५ दिवस पुण्यात पावसाची उघडझाप चालूच आहे. पण आज (२१ जून २०१५, रविवार) पुण्याच्या बऱ्याच भागात चांगला पाऊस होत्तो आहे. त्यामुळे पुण्यात दिवसाच्या तापमानात चांगलीच घट झाली असून वातावरण आल्हाददायक झाले आहे. अरबी समुद्रा कडून येणाऱ्या सशक्त मौसमी वाऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला जोरदार पाऊस होतो आहे. या वाऱ्यांमुळे ठाणे, रायगड आणि पुणे या जिल्ह्यातील आर्द्रतेचे प्रमाण देखील वाढलेले आहे. भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागानुसार पुढील २ ते ३ दिवस कमीजास्त स्वरूपाचा पाऊस सुरूच राहील. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस येत राहील.
विदर्भात देखील अजून चोवीस तास मुसळधार पावसाची शक्यता
गेल्या चोवीस तासा पासून विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. हा पाऊस विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यात पडत आहे. गेल्या चोवीस तासात चंद्रपूर येथे २०० मिमी, अमरावती येथे ५१ मिमी, यवतमाळ येथे ५१ मिमी, वर्धा येथे ४९ मिमी, नागपूर येथे ४५ मिमी आणि ब्रम्हपुरी येथे ३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सध्या ओडीशाच्या किनारपट्टीला असलेले कमी दाबाचे क्षेत्र प्रभावी झाले असून ते पश्चिमेकडे सरकत आहे. त्यामुळे तेलंगणा आणि विदर्भात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासात विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर हा पाऊस पूर्व मध्यप्रदेश आणि छत्तीसगड कडे सरकेल. विदर्भ पाण्यासाठी पावसावर अवलंबून असल्याने हा पाऊस शेती व भूजल पाणीसाठा भरून काढण्यासाठी खुप महत्वाचा आहे.