[Marathi] भारताच्या द्वीपकल्पाच्या भागात अजूनही ७२ तास चांगला पाऊस येणे अपेक्षित

September 28, 2015 4:34 PM | Skymet Weather Team

सप्टेंबर महिन्याच्या शेवटी नैऋत्य मान्सूनने भारताच्या द्वीपकल्पाच्या भागात म्हणजेच तामिळनाडू, केरळ आणि दक्षिण कर्नाटकाचा आतील भाग या सर्व ठिकाणी चांगलाच जोर पकडलेला दिसून येतो आहे. परंतु या भागातील संपूर्ण मान्सून पर्व बघितल्यास फक्त जून महिन्यात सरासरीपेक्षा १९% जास्त पाऊस झाला होता, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मात्र कमी पाऊस होऊन २०% कमी पावसाने या महिन्यांचा शेवट झाला होता.

सप्टेंबर महिना मात्र त्या मानाने चांगला ठरला आहे. द्वीपकल्पाच्या भागातील संपूर्ण पावसाची सरासरी बघता सध्या दिनांक २७ सप्टेंबरला १६% वर स्थिर आहे. परंतु हवामान शास्त्रानुसार हि आकडेवारी सामान्य पातळीत गणली जाते.

जसजसा महिन्याचा शेवट जवळ येतोय तसतसा नैऋत्य मान्सूनचा जोर वाढताना दिसून येतोय. सध्या तामिळनाडूतील मदुराई आणि धर्मापुरी येथे रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात अनुक्रमे ६८.८ मिमी आणि ५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच याच वेळेत पुनालूर आणि कोची येथे अनुक्रमे २६.६ मिमी आणि १८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

तामिळनाडू आणि केरळ या भागातील हवेच्या तुटकपणामुळे हा पाऊस होतो आहे. तसेच बंगालच्या उपसागरापासून ते उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीला अगदी खालच्या पातळीला कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने या भागात चांगला पाऊस सुरु आहे.

स्कायमेट या संस्थेच्या हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या शास्त्रज्ञांनुसार तामिळनाडू, केरळ आणि दक्षिण कर्नाटकचा आतील भाग या सर्व ठिकाणी येत्या तीन दिवसात चांगला आणि व्यापक पाऊस होणे अपेक्षित आहे. या पावसामुळे या भागातील पावसाची कमतरता भरून निघेल आणि त्याचबरोबर आकडेवारीत सुद्धा चांगले बदल होण्यास मदत होईल.

Image Credit: deccanchronicle.com

OTHER LATEST STORIES