जुलैच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावसाचे प्रमाण अधिक होते पण जुलै महिना जसा सुरु झाला तसे हा पाऊस कमी होऊन या भागात तुटवडा निर्माण झाला. मराठवाड्यात तर ४९% पावसाची कमतरता निर्माण झाली असून कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्राची जवळपास तशीच परिस्थिती आहे. अपुऱ्या येणाऱ्या पावसामुळे जुलै महिन्या बाबत तशी स्पष्टता निर्माण झालीच नाही. परंतु आता या अपुऱ्या पावसाची उणीव येत्या काही दिवसात भरून निघेल असा अंदाज आहे.
भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागानुसार हा होणारा पाऊस सतत ३ ते ४ दिवस होणे अपेक्षित असून यामुळे मध्य महाराष्ट्र (-३३%), विदर्भ (-१७%), कोकण व गोवा (-३०%) आणि मराठवाडा (-४९%) या भागातील पावसाची कमतरता जसजसा जुलै महिन्याचा उत्तरार्ध संपेल तसतशी भरून निघेल असा अंदाज आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रातील मोठी शहरे मुंबई, पुणे, अकोला आणि नागपूर हे कोरडीच रहात होती आणि त्यामुळे तेथील नागरिकांना असह्य वातावरणाचाही सामना करावा लागला. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या खरीप पिकांच्या लागवडीचे नुकसान होते कि काय अशी काळजी सध्या सतावू लागली आहे.
परंतु स्कायमेट या संस्थेच्या हवामानाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात उत्तर आणि दक्षिण कोकणात तसेच उत्तर व दक्षिण महाराष्ट्रातील बऱ्याच भागात आणि पूर्व व पश्चिम विदर्भात व मराठवाड्यातील काही भागात भरपूर पाऊस आणि वादळी पाऊस होणे अपेक्षित आहे. तसेच पश्चिम किनारपट्टीला मान्सूनची लाटही सक्रीय झाली असून त्यामुळेही महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल आणि आर्द्रतापूर्ण वातावरणापासून सुटका होईल.
Image Credit: economictimes.com