या वर्षी गणपती चक्क १२ दिवसांसाठी आले होते. आज गणपती विसर्जन आहे. या साठी राज्यभरातील गणेशभक्त खूप उत्साहात विसर्जनाची तयारी करित आहेत.
यावर्षी महाराष्ट्रातील बहुतांश भागांत गणेश चतुर्थीची सुरुवात पावसाने झालेली होती. वास्तविक, सुरुवातीपासून मुंबई मध्ये पावसाची रिपरिप सुरूच होती, व गणेशोत्सवा दरम्यान मुंबईत प्रचंड मुसळधार पावसामुळे पूर सदृश परिस्थिती सुद्धा निर्माण झाली होती. तथापि, उत्सवाच्या शेवटच्या दिवसात पावसाने विश्रांती घेतल्याने आधी झालेल्या जोरदार पावसाची तमा न बाळगता मुंबईकरांनी गणेशोत्सवचा आनंद घेतला.
महाराष्ट्रातील बहुतांश भागात हवामान प्रामुख्याने आल्हाददायक झालेले असल्यामुळे तसेच मुंबईत तुंबलेले पाणी आता ओसरल्यामुळे आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईकरांचा उत्साह नक्कीच द्विगुणीत झालेला आहे असे म्हणणे वावगे होणार नाही. सुरक्षेच्या दृष्टीने व गणपती विसर्जन सुरळीत पणे व्हावे यासाठी आज शहरातील अनेक मार्ग बंद करण्यात आलेले आहेत व काही ठिकाणी वाहतुकीत देखील बदल करण्यात आलेला आहे.
[yuzo_related]
आज असंख्य भाविकांच्या उपस्थितीत लालबागच्या राजाचे विसर्जन होणार असल्यामुळे मुंबईत सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे, पुण्यात देखील कडक सुरक्षा व्यवस्थेत गणपती विसर्जन होणार आहे.
स्काइमेटच्या अंदाजानुसार, राज्यातील बहुतांश भागांमध्ये हवामान जवळजवळ कोरडे राहण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने पुणे, परभणी, कोल्हापूर, सांगली आणि नाशिक जिल्ह्यांत दिवसभर हवामान कोरडेच राहण्याची शक्यता आहे. तसेच, तापमान 30 अंशच्या खाली राहील त्यामुळे राज्यातील जनतेचा उत्साह नक्कीच द्विगुणीत होईल. दरम्यान अकोला आणि चंद्रपूर येथे मात्र हवामान थोडेसे गरम राहण्याची शक्यता आहे मात्र असे असले तरी एकंदरीत हवामान आरामदायक राहण्याची शक्यता आहे.
Image Credit: sankashti.com