गेले काही दिवस पावसाने संपूर्ण भारतात दडी मारलेली आहे. परंतु आता पश्चिम किनारपट्टीलगत असलेला कमी दाबाचा पट्टा थोडा सक्रीय झाल्यामुळे त्या भागात पुन्हा पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.
मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात कोकणातील मुळदे आणि भिरा येथे अनुक्रमे ८६ व ८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच ठाणे आणि रत्नागिरी येथे अनुक्रमे ७८ व ३७ मिमी पावसाची नोंद झाली असून मुंबईत ९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मध्यमहाराष्ट्रात देखील काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर येथे मंगळवारी सकाळी ८.३० पर्यंत गेल्या २४ तासात ५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच कोल्हापूर व नाशिक येथे अनुक्रमे ११ व ९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
येत्या ४८ तासात कोकण-गोवा व मध्यमहाराष्ट्र या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच राहील. तसेच विदर्भात पुढील २ ते ३ दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
मान्सून पुन्हा एकदा पूर्व आणि मध्य भारतात जोर पकडण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे, सद्यस्थितीला भारतात सर्वात कमी पाऊस झालेल्या मराठवाड्यात येत्या ४८ तासात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
स्कायमेट या संस्थेकडे असलेल्या आकडेवारीनुसार जून मध्ये मराठवाडा वगळता महाराष्ट्रातील इतर उपभागात चांगला पाऊस झाला होता. परंतु जुलै महिन्यात संपूर्ण भारतभरात मान्सूनचा पाऊस कमी झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील चार उपभाग कमी पावसाच्या वर्गवारी मध्ये गेले.
२५ ऑगस्ट रोजीची स्थिती पाहता या उपभागात अजूनही पावसाची कमतरता आहे. त्यातल्यात्यात विदर्भात सरासरीच्या १३% कमी पाऊस झाल्याने परिस्थिती थोडीशी बरी आहे.
Image Credit: dnaindia.com