अनेक प्रकारच्या हवामान प्रणाली तयार झाल्या असल्यामुळे देशभरात बऱ्याच भागात चांगला पाऊस सुरु आहे. देशातील काही भागात मात्र हा होणारा पाऊस निसर्गाचे अभूतपूर्व रूप दाखवणारा असून या पावसामुळे त्या भागात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. सद्यस्थितीत पुरग्रस्त भाग म्हणजे पश्चिम मध्य प्रदेश तसेच दक्षिण आणि पश्चिम राजस्थान आणि पश्चिम बंगाल.
राजस्थानातील पूरस्थिती गंभीर, शेकडोंनी गावकऱ्यांचे स्थलांतर
दक्षिण आणि पश्चिम राजस्थानात झालेल्या धुंवाधार पावसामुळे गावेच्या गावे पूरग्रस्त झालेली असून त्यांचा महामार्गा बरोबरचा संपर्कही तुटलेला आहे. आतापर्यंत चार लोकांनी आपले प्राण गमावले आहेत, त्यातील २ जण जयसलमेर येथील होते आणि इतर दोघे अलवर येथील रहिवासी होते. एनडीआरएफ चे दल आपत्तीग्रस्त भागात जाऊन पोहचले आहे.
सध्या पश्चिम राजस्थानवर ताकदवान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने दक्षिण आणि आग्नेय राजस्थानात चांगलाच व्यापक आणि जोरदार ते धुंवाधार पाऊस होईल. तसेच या प्रणालीचे रुपांतर अति कमी दाबाच्या क्षेत्रात होईल आणि त्यामुळे अजूनच जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम गुजरातमधील कच्छवरही होईल.
स्कायमेट या संस्थेनुसार या भागातील सुरु असलेला पाऊस जोरदार ते धुंवाधार स्वरूपाचा असून पुढील ४८ तास हा पाऊस असाच चालू राहील. आणि त्यानंतर पुढचे दोन दिवस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस येतच राहील. दक्षिण राजस्थानातील बऱ्याच भागात पुराची भीती निर्माण झाली असून बऱ्याच भागात आधीच पूरसदृश परिस्थिती आहे. या भागात नेहमीच खूपच कमी पाऊस होतो आणि त्यामुळे तेथील राज्य सरकारने पाणी वाहून जाईल अशी उपाययोजना केलेलीच नाही. आणि यामुळेच थोडाजरी जास्त पाऊस झाला तरी पूरसदृश परिस्थिती लगेचच निर्माण होते.
गेल्या २४ तासात बारमेर येथे ६४ मिमी पाऊस, जालोर येथे ७९ मिमी, जयसलमेर येथे २६ मिमी, पाली येथे १२१ मिमी, चित्तोडगढ येथे ६७ मिमी आणि कोटा येथे ६९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या आकड्यांवरून या भागाची परिस्थिती लक्षात येते आणि येत्या ४८ तासात यापासून सुटकाही नाही हेही निश्चितच आहे.
पश्चिम मध्य प्रदेशातही पूरस्थिती, अजूनही जोरदार पावसाची शक्यता
पश्चिम मध्य प्रदेशात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे बऱ्याच जिल्ह्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तसेच उज्जैन, भोपाळ आणि इंदोर या शहरातही जोरदार पाऊस झाल्यामुळे येथेही पावसाची नोंद चांगलीच झाली आहे आणि बराच भाग पाण्याखालीही आहे.
पश्चिम राजस्थान आणि लगतच्या मध्य प्रदेशवर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम मध्य प्रदेशात चांगलाच पाऊस होईल. आतातरी हि हवामान प्रणाली अशीच सातत्याने सुरु राहील आणि येत्या २४ ते ३६ तासात चांगला पाऊस होईल. जसजशी हि प्रणाली पाकिस्तानकडे सरकेल तसतसा पश्चिम मध्य प्रदेशच्या पावसाची तीव्रता कमी होईल.
(Featured Image Credit: indianexpress.com)