[Marathi] महाराष्ट्र पूर: सातारा, सांगली,आणि कोल्हापूर मध्ये पावसाचा जोर कमी होणार, पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात

August 11, 2019 1:53 PM | Skymet Weather Team

मुसळधार पावसानंतर आता महाराष्ट्रात पावसाच्या तीव्रतेत लक्षणीय घट झाली आहे. गेल्या २४ तासांत कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडला असून मराठवाडा विभाग मात्र कोरडाच राहिला आहे.

गेल्या २४ तासांत सातारा येथे १२.१ मिमी, नाशिक १०.९ मिमी, पुणे ६.३ मिमी, रत्नागिरी १५.३ मिमी, हर्णे १०.४ मिमी, कोल्हापूर ३.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान दक्षिण गुजरात किनाऱ्यापासून लक्षद्वीपपर्यंत कमी दाबाचा पट्टा विस्तरलेला आहे. या प्रणालीच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवरील बऱ्याच भागात मध्यम पाऊस सुरूच राहील.

सांताक्रूझ, कुलाबा, अलिबाग, हर्णे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे एक दोन मुसळधार सरींसह मध्यम पाऊस सुरु राहील तर सांगली, सातारा आणि कोल्हापुरात आणखी ४८ तास मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याउलट मराठवाडा बहुधा कोरडाच राहील, तथापि पूर्वेकडील भागात एक दोन सरींची शक्यता नाकारता येत नाही.

विदर्भाच्या बाबतीत सांगायचे तर, बंगालच्या उपसागरात चक्रवाती प्रणाली आहे जी लवकरच कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतरित होईल आणि वायव्येकडे सरकेल. या प्रणालीच्या प्रभावामुळे, ४८ तासांनंतर या भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यंत, केवळ हलक्या ते मध्यम सरी सुरु राहतील.

राज्यात पावसामुळे परिस्थिती फारच बिकट होती, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. सुमरे ४ लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थानांतरित करण्यात आले आहे, अजूनही विविध भागात बचावकार्य सुरू आहे. पावसाचा जोर आता कमी झाल्याने पूर परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे आणि लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल.

चांगल्या पावसामुळे कोकण आणि गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाचे अनुक्रमे ४९% आणि ७६% आधिक्य आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे विदर्भाला देखील पावसाचे आधिक्य असलेल्या गटात प्रवेश करण्यात मदत झाली आहे, तर मराठवाडा हा महाराष्ट्रातील एकमेव विभाग आहे जिथे अजूनही पावसाची कमतरता १६% आहे.

Image Credits – The Hindu

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES