[Marathi] ऑक्टोबर महिन्यातील परस्परविरोधी वातावरण

October 1, 2015 7:03 PM | Skymet Weather Team

ऑक्टोबर महिन्यात भारतात दोन ऋतू बदलत असतात. उन्हाळा संपून हिवाळ्याकडे वाटचाल सुरु असते. याच काळात संपूर्ण भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळे वातावरण अनुभवावयास मिळते. सध्या ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात नैऋत्य मान्सूनने उत्तर आणि मध्य भारतातून पूर्णपणे माघार घेतलेली आहे. त्याबरोबरच पश्चिमी विक्षोभासारखे अडथळे पण कमी झाले आहेत त्यामुळे या भागातील कोरडया वातावरणात भर पडली आहे.

सध्या असणाऱ्या स्वच्छ आकाश आणि लख्ख सूर्यप्रकाशामुळे दिवसाच्या तापमानात वाढ झाली असून रात्रीचे तापमान मात्र कमी झालेले जाणवते. उदाहरणादाखल दिल्लीतील सफदरजंग येथील वेधशाळेच्या नोंदीनुसार दिल्लीत दिवसा तापमान ३२.९ अंश से. असून सप्टेंबर महिन्यात हेच तापमान ३४ अंश से. असे होते आणि रात्रीचे तापमान २५ अंश से. असे होते. सध्या १९ अंश से. ला स्थिरावले आहे, थोडक्यात रात्रीचे तापमान ६ अंश से. ने कमी झालेले आहे.

उत्तर भारतात ऑक्टोबर महिन्याच्या पूर्वार्धात चांगले वातावरण असेल परंतु नंतर मात्र हवेत आणि वातावरणात अचानक बदल होतील. जम्मूकाश्मीरच्या वरच्या भागात बर्फवृष्टीला सुरुवात होईल.

भारताच्या पूर्व आणि ईशान्येकडील भागातून नैऋत्य मान्सूनला माघार घेण्यास या महिन्याचा मध्य नक्कीच उजाडेल त्यामुळे या भागात चांगले वातावरण असेल. त्यानंतर मात्र पाऊस कमी होईल.

भारताच्या पश्चिमेकडील भागात म्हणजेच गुजरात आणि राजस्थानात एकप्रकारे दुसरा उन्हाळाच अनुभवावयास मिळतो. कारण या भागातील कच्छ, भूज आणि नलिया याठिकाणी दिवसाचे तापमान ४० अंश से. ला जाऊन पोहचते.

ऑक्टोबर महिन्यात ईशान्य मान्सूनचाही प्रवेश भारतात होत असतो. फक्त नैऋत्य मान्सुनसारखी याची येण्याची वेळ नक्की नसते. या मान्सूनमुळे आंध्रप्रदेशाची किनारपट्टी, रायलसीमा, तामिळनाडू आणि कर्नाटकात पाऊस होतो. तामिळनाडू मध्ये या ईशान्य मान्सून काळात मोठ्याप्रमाणात पाऊस होतो. या राज्यासाठी हा मुख्य मान्सूनचा काळ असतो.

भारताच्या दक्षिणी द्वीपकल्पाच्या भागात नैऋत्य मान्सून ऑक्टोबर महिन्याच्या पूर्वार्धात सुरूच राहणार आहे. ईशान्य मान्सूनमुळे वरील भागात पहिलाच मोठा पाऊस होईल. त्यामुळेच द्वीपकल्पाच्या भागात संपूर्ण महिनाभर चांगला पाऊस होईल असे अपेक्षित आहे.

OTHER LATEST STORIES